3, 2, 1! इस्त्रोचा आवाज हरपला; काऊंटडाऊन करणाऱ्या शास्त्रज्ञ वलारमती यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 08:45 AM2023-09-04T08:45:53+5:302023-09-04T08:46:35+5:30
चंद्रयान ३ चे काऊंटडाऊन केले, पण आदित्यचे करायची इच्छा होती, करू शकल्या नाहीत...
चंद्रयान ३ असो की इस्त्रोच्या कोणत्याही मोहिमेच्या उड्डाणावेळी अवघा देश एक आवाज ऐकायचा, १०,९,८,७... अशी उलटी गिनती सुरु असायची तो आवाज आज हरपला आहे. हा आवाज यापुढे ऐकायला येणार नाहीय. इस्त्रोच्या या संशोधक वलारमती यांचे निधन झाले आहे.
भारत हा 1.4 अब्ज लोकसंख्येचा देश, तरीही काही लोकांचे आवाज लोकांच्या मनात अनंतकाळ कोरलेले आहेत. या यादीत सेलिब्रिटी, राजकारणी, क्रीडा व्यक्तिमत्व आणि अगदी वैज्ञानिकांचाही समावेश आहे. ISRO रॉकेट प्रक्षेपण करताना हा आवाज अनेकांनी ऐकलेला आहे. परंतू, आता हा आवाज यापुढे ऐकायला येणार नाही असे इस्त्रोने कळविले आहे.
इस्त्रोच्या महिला संशोधक वलारमती यांचे हृहयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांचा अखेरचा आवाज चंद्रयान ३ च्या उड्डाणावेळी ऐकला गेला होता. आदित्य एल १ वेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या उपलब्ध नव्हत्या. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालविली. त्या गेली सहा वर्षे इस्रोच्या रॉकेट लाँचिंगचे काऊंटडाऊन करत होत्या.
शनिवारी संध्याकाळी चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
“श्रीहरिकोट्टा येथून इस्रोच्या भविष्यातील मोहिमांच्या काउंटडाउनसाठी वलरमथी मॅडमचा आवाज ऐकू येणार नाही. चंद्रयान 3 ही तिची अंतिम काउंटडाउन घोषणा होती. अनपेक्षित निधन. खूप वाईट वाटतेय. प्रणाम!", असे शास्त्रज्ञ डॉ वेंकीटाकृष्णन यांनी X वर लिहिले आहे.