दिल्लीच्या दुर्घटनेतील ३ मृतदेह सापडले; पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये मृतांची संख्या ८ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 11:53 AM2024-06-30T11:53:37+5:302024-06-30T11:53:52+5:30
दिल्लीतील पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मुसळधार पावसामुळे येथील वसंत विहार परिसरात एका बांधकामाच्या ठिकाणी कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्यातून शनिवारी तीन मजुरांचे मृतदेह बाहेर काढले. यासह दिल्लीतील पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. शुक्रवारी वसंत विहार भागात बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळली. घटनेची माहिती दिल्ली आपत्ती निवारण विभागाला पहाटे मिळाली. यांनतर तेथे बचावकार्य सुरू झाले. ढिगाऱ्यातून तीन मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. संतोषकुमार यादव (१९) आणि संतोष (३८) अशी दोघांची नावे आहेत. तिसऱ्या मृत मजुराची ओळख अद्याप पटलेली नाही. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकलेले आहेत की नाही, यासाठी शोधमोहीम सुरू आहे. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि नागरी संस्थांचे पथक संयुक्त बचाव मोहिमेत काम करीत आहेत. तसेच शुक्रवारी पावसाशी संबंधित इतर घटनांमध्ये शहरात पाच जण मृत्युमुखी पडले आहेत.
‘आयएमडी’कडून ऑरेंज अलर्ट जारी
दिल्लीत येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शनिवारी सांगितले. ८८ वर्षांतील सर्वांत मुसळधार पावसासह दिल्लीत मान्सूनचे आगमन झाले आहे; तसेच पुढील चार दिवस शहरात मुसळधार पावसासाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अयोध्येत रामपथ जलमय, ६ अभियंते निलंबित
२३ जून व २५ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरात रामपथ काही ठिकाणी खचला तसेच तिथे अनेक भागांत पाणी साचले. काही घरे जलमय झाली. त्यामुळे नागरी सुविधा उत्तम स्थितीत राखण्यात निष्काळजीपणा दाखवल्याच्या आरोपावरून तेथील सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. रामपथ व त्याला लागून असलेले १५ उपमार्ग पावसामुळे जलमय होऊन तेथील रहिवाशांचे खूप हाल झाले होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता ध्रुव अग्रवाल, सहायक अभियंता अनुज देशवाल, कनिष्ठ अभियंता प्रभात पांडे, उत्तर प्रदेश जल निगमचे आनंदकुमार दुबे (कार्यकारी अभियंता), राजेंद्रकुमार यादव (सहायक अभियंता), मोहम्मद शाहिद (कनिष्ठ अभियंता) यांना निलंबित करण्यात आले आहे. रामपथ बांधल्यानंतर काही दिवसांतच तिथे खड्डे पडले होते. (वृत्तसंस्था)