अबब! ३ कोटी रोकड अन् १३३ सोन्याचे सिक्के सापडले; आप मंत्र्यांच्या अडचणीत भर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 04:52 PM2022-06-07T16:52:39+5:302022-06-07T16:53:00+5:30
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने सत्येंद्र जैन यांना ३० मे रोजी अटक केली होती.
नवी दिल्ली - दिल्लीच्या केजरीवाल सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ईडीनं जैन यांच्या निकटवर्तीयाच्या घरात छापा टाकला. त्यात जवळपास २.८२ कोटी रोकड आणि मोठ्या प्रमाणात सोने जप्त करण्यात आले आहे. छापेमारीत कॅश आणि १३३ सोन्याचे सिक्के सापडल्याचं सांगण्यात येत आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सत्येंद्र जैन यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर ईडीकडून धाड टाकली जात आहे.
सत्येंद्र जैन हे दिल्ली सरकारमधील आरोग्य मंत्री आहेत. हवाला ऑपरेटर्सच्या माध्यमातून त्यांनी मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहे. ईडीने आज त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. त्यात जैन यांच्या निकटवर्तीयाच्या घरातून ३ कोटी कॅश सापडली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने सत्येंद्र जैन यांना ३० मे रोजी अटक केली होती. अटकेनंतर ईडीने सत्येंद्र जैन यांना कोर्टात हजर केले तिथे ९ जूनपर्यंत जैन यांना ईडीची कोठडी सुनावली आहे.
नेमकं प्रकरण काय?
सत्येंद्र जैन यांनी २०१५-१६ मध्ये तीन खासगी कंपन्यांच्या माध्यमातून पैसा मिळविल्याचा आरोप आहे. प्रायाज इन्फो सॉल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, अकिनन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मनगलियातन प्रोजक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या शेअरमधून कथितरित्या कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता मिळविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच, सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबीयांचे सुद्धा या कंपनांमधून शेअर आहेत.
मी स्वत: प्रकरणाचा अभ्यास केला, हे पूर्णपणे फेक आहे - अरविंद केजरीवाल
सत्येंद्र जैन यांना ईडीने अटक केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला. सत्येंद्र जैन यांच्याविरोधातील प्रकरण पूर्णपणे फेक असून राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर अरविंद केजरीवाल म्हणाले, "तुम्ही पंजाबमध्ये एका राज्यमंत्र्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकले होते ज्याची कोणत्याही तपास संस्थेला किंवा विरोधी पक्षाला कल्पना नव्हती. आम्ही हवं असतं तर ते दडपून टाकू शकलो असतो, पण आम्ही स्वतःहून त्याच्यावर कारवाई सुरू केली आणि त्याला अटक केली. मी स्वत: सत्येंद्र जैन यांच्यावरील खटल्याचा अभ्यास केला आहे. ते प्रकरण पूर्णपणे फेक आहे आणि त्यांना राजकीय कारणांसाठी हेतुपुरस्सर गोवण्यात आले आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. जैन हे सत्याच्या मार्गावर आहेत आणि ते स्वच्छ बाहेर येतील असं त्यांनी म्हटलं होते.