९० दिवसांत ३ कोटी लोकांना मिळाली नोकरी; अनेक क्षेत्रांत संधी, कामगार मंत्रालयाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 08:52 AM2022-01-11T08:52:19+5:302022-01-11T08:52:44+5:30
कामगार मंत्रालयाने सोमवारी तिमाही रोजगार सर्वेक्षण जाहीर केले आहे.
नवी दिल्ली : कोरोना संकटातही सध्या काही क्षेत्रांमध्ये नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. देशातील प्रमुख ९ क्षेत्रांत नोकऱ्या उपलब्ध झाल्या असून, जुलै ते सप्टेंबर २०२१ दरम्यान ३ कोटींपेक्षा अधिक जणांना रोजगाराची संधी मिळाली असल्याचे कामगार मंत्रालयाने म्हटले आहे.
कामगार मंत्रालयाने सोमवारी तिमाही रोजगार सर्वेक्षण जाहीर केले आहे. या सर्वेक्षणानुसार गेल्या वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर दरम्यान नऊ क्षेत्रांमध्ये ३.१० कोटी रोजगार निर्माण झाले. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी कामगार कार्यालयाने तयार केलेले तिमाही सर्वेक्षण जाहीर केले.
दुसरा अहवाल
कामगार मंत्रालयाचा हा नोकऱ्यांबाबतचा दुसरा अहवाल आहे. पहिला अहवाल एप्रिल-जून २०२१ मध्ये सादर करण्यात आला होता. या अभ्यासामध्ये १० किंवा अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांचा समावेश करण्यात आला होता.
या क्षेत्रांत आहे नोकरीची संधी
उत्पादन, बांधकाम, व्यापार, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, गृहनिर्माण, हॉटेल, आयटी, बीपीओ आणि आर्थिक सेवा या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी निर्माण झाल्याचे कामगार मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यांनी लॉकडाऊन हटविल्याने आर्थिक सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे.