देशात ३ कोटी चाचण्या, कोरोना टेस्टचा नवा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 02:18 AM2020-08-17T02:18:16+5:302020-08-17T06:51:00+5:30
दररोज दहा लाख कोरोना चाचण्या करण्याचे लक्ष्य भारत लवकरच गाठण्याची शक्यता आहे.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : देशभरात आतापर्यंत पार पडलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या रविवारी तीन कोटी झाली असून हा एक विक्रम आहे. शनिवारी ही संख्या २ कोटी ९३ लाख होती. रविवारी त्यामध्ये सात लाखांहून अधिक चाचण्यांची भर पडली. दररोज दहा लाख कोरोना चाचण्या करण्याचे लक्ष्य भारत लवकरच गाठण्याची शक्यता आहे.
दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या संख्येत वेगाने वाढ करण्यात आल्याने अवघ्या पंधरा दिवसांत चाचण्यांचा एकूण संख्येचा आकडा २ कोटींवरून ३ कोटींवर गेला. त्याआधी हा आकडा १ कोटींवरून २ कोटींवर जाण्यास एक महिना लागला होता. शनिवारी देशात ८ लाख ६९ हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता दरदिवशी १० लाख कोरोना चाचण्या करण्याचा टप्पा लवकरच गाठण्याची शक्यता आहे. दररोज १० लाख कोरोना चाचण्या पार पाडाव्यात, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेला १ आॅगस्ट रोजी दिले होते. मार्च महिन्यात देशभरात फक्त ३०० कोरोना चाचण्या होत होत्या आणि आता देश दररोज १० लाखांचा टप्पा गाठण्याकडे वाटचाल करीत आहे. कोरोना चाचण्यांसाठी देशामध्ये अगदी प्रारंभी तीनच प्रयोगशाळा होत्या. आता त्यांची संख्या पाच महिन्यांत दीड हजारांपर्यंत गेली आहे. त्यात महाराष्ट्रातील १४४ प्रयोगशाळांचा समावेश आहे. या राज्यात खासगी क्षेत्रातील ६७ प्रयोगशाळा कोरोना चाचणीच्या कामात सहभागी झाल्या आहेत.
कोरोनाच्या अधिकाधिक चाचण्या केल्याने रुग्णांसंदर्भातील चित्र आणखी स्पष्ट होते. त्यामुळे राज्यांनी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचे प्रमाण १५ आॅगस्ट रोजी ९.५ टक्क्यांवरून ८.८ टक्क्यांपर्यंत खाली घसरले, ही दिलासादायक बाब आहे.