२२ राज्यांमध्ये ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; गंगा-यमुनेसह अनेक नद्या धोक्याच्या चिन्हावर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 11:06 AM2023-07-26T11:06:45+5:302023-07-26T11:07:01+5:30
आज मध्य महाराष्ट्र, पूर्व गुजरात, कोकण, गोवा, तेलंगणा, रॉयल सीमा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे.
नवी दिल्ली: हवामान विभागाने पुढील तीन दिवस २२हून अधिक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसह संपूर्ण उत्तर पश्चिम भारत ते ईशान्य आणि दक्षिण भारत राज्यांचा समावेश आहे.
आज मध्य महाराष्ट्र, पूर्व गुजरात, कोकण, गोवा, तेलंगणा, रॉयल सीमा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. गंगा, यमुना, घग्गर, हिंडन यासह सर्व प्रमुख नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत असून अनेक भाग पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि चंदीगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
उत्तराखंडमध्ये हवामान जवळजवळ स्वच्छ होते, परंतु नंदप्रयागमध्ये ढिगारा पडल्याने बद्रीनाथ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मंगळवारीही भूस्खलनामुळे यमुनोत्री रस्ता बंद होता. मात्र, केदारनाथ यात्रा सुरूच आहे. राज्यात सध्या ५० रस्ते बंद असून सुमारे ४० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. ४०० छोटे-मोठे कालवे वाहून गेले आहेत. हरिद्वारमध्ये, गंगा अजूनही २९३.४५ मीटरवर, धोक्याच्या चिन्हाच्या (२९३ मीटर) वरती वाहत आहे.
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे पाच घरे उद्ध्वस्त
हिमाचलच्या कुल्लूच्या गडसा खोऱ्यात मंगळवारी पहाटे ४ वाजता ढगफुटीमुळे पंचनाला आणि हुर्ला नाल्यांना मोठा पूर आला. पाच घरे वाहून गेली असून १५ घरांचे नुकसान झाले आहे. चार छोटे-मोठे पूलही वाहून गेले असून काही गुरे बेपत्ता आहेत. भुंतर-गडसा मणियार रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पार्वती खोऱ्यातील मणिकर्ण येथे ब्रह्मगंगा नाल्याला आलेल्या पुरात एका कॅम्पिंग साईटचे नुकसान झाले आहे. माळणा प्रकल्पाच्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पांडोह धरणातून पाणी सोडल्याने बियासच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. ५००हून अधिक रस्ते बंद आहेत.
फिरोजपूरमध्ये घर कोसळल्याने शाळा २९ तारखेपर्यंत बंद
डोंगराळ भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंजाबमधील अनेक भाग पुराच्या तडाख्यात आले आहेत. सतलजच्या तडाख्याने फाजिल्का आणि फिरोजपूर जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले आहे. फाजिल्का येथील भारत-पाक सीमेवर असलेल्या धानी नत्था सिंग वाला गावात पूल पाण्याखाली गेला आहे. फिरोजपूरच्या कालू वाला या सीमावर्ती गावात पुरामुळे अनेक घरे कोसळली आहेत. येथे ग्रामस्थांना घराच्या गच्चीवर सामान घेऊन बसावे लागले. हुसैनीवाला लगतच्या गावातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. फिरोजपूरमधील ८ आणि फाजिल्कामधील १० शाळा २९ तारखेपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत.