देशातील सर्वात उंचावरील रोप-वेमध्ये रात्रभर जीव मुठीत धरून हवेत लटकत होते ४८ भाविक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 05:58 AM2022-04-12T05:58:46+5:302022-04-12T05:59:01+5:30
झारखंडच्या देवघर परिसरात त्रिकूट पर्वतावर झालेल्या रोपवे दुर्घटनेमुळे अवघा देश हादरून गेला आहे.
देवघर (झारखंड) :
झारखंडच्या देवघर परिसरात त्रिकूट पर्वतावर झालेल्या रोपवे दुर्घटनेमुळे अवघा देश हादरून गेला आहे. घटनास्थळ बाबा बैद्यनाथ मंदिरापासून साधारण २० किलोमीटरवर आहे. रोपवेमध्ये बिघाड झाल्यानंतर एनडीआरएफच्या पथकांनी युद्धपातळीवर हालचाली करून सोमवारी दिवसभर ३३ जणांना सुखरुप खाली उतरवले आहे. एकूण तीन जणांच्या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. ४८ जण अन्न पाण्यावाचून रात्रभर जीव मुठीत धरून हवेत लटकत असलेल्या ट्रॉलीत हेलकावे खात होते. २३ तास उलटल्यानंतरही ट्रॉलीमध्ये अद्यापही १४ जण अडकले आहेत. अंधार पडू लागल्याने बचावकार्य आता मंगळवारी सकाळी सुरु करण्यात येणार आहे. अडकलेल्यांना ड्रोनच्या सहाय्याने पाणी आणि खाद्यपदार्थ दिले जात आहेत.
देवघरचे उपायुक्त मंजुनाथ भजंत्री म्हणाले की, ‘भाविकांना हवाई दलाच्या २ हेलिकॉप्टर्सच्या मदतीने खाली उतरवले आहे. तांत्रिक बिघाडामुळे रोपवेची एकमेकांना धडक झाली.’
१९ तास ट्रॉलीत अडकून पडलेल्या संदीप यांनी सांगितले की, ‘मला असे वाटते की बाबा बैद्यनाथ यांनी मला पुनर्जन्म दिला. मी रात्रभर हवेत लटकत असलेल्या ट्रॉलीत अडकून पडल्याचा भयानक अनुभव मी शब्दांत सांगू शकत नाही. जवळपास १०० फूट उंचीवर ट्रॉली हवेत लटकलेली होती.’
काय घडले?
दुपारी ४ वाजता (रविवारी) हा बिघाड झाला
२६ ट्रॉली मंदिराकडे निघाल्या होत्या
तारांवर वजन वाढल्याने रोलर तुटला व तीन ट्रॉली डोंगराला धडकल्या
त्यावेळी दोन ट्रॉली खाली कोसळल्या
१२ प्रवासी जखमी झाले, दोघांचा मृत्यू झाला
त्यानंतर अन्य ट्रॉली आपसात धडकल्या आणि थांबल्या
३३ जणांना एनडीआरफच्या पथकांनी सुखरूप खाली उतरवले
सोमवारी सहा वाजल्यानंतर अंधार पडू लागल्याने बचावकार्य थांबवले आहे
...पण त्याला मृत्यूने गाठलेच
एनडीआरएफने मदतकार्य सुरू केल्यानंतर हेलिकॉप्टरद्वारे काही भाविकांना बाहेर काढण्यात येत होते. याच दरम्यान एका भाविकाला केबलकारमधून बाहेर काढत हेलिकॉप्टरपर्यंत नेले. हा भाविक हेलिकॉप्टरच्या दरवाजापर्यंत पोहोचला पण आत शिरत असताना त्याचा बेल्ट तुटला आणि काही क्षणात तो खाली पडला.
मला असे वाटते की बाबा बैद्यनाथ यांनी मला पुनर्जन्म दिला. मी रात्रभर हवेत लटकत असलेल्या ट्रॉलीत अडकून पडल्याचा भयानक अनुभव मी शब्दांत सांगू शकत नाही. जवळपास १०० फूट उंचीवर ट्रॉली हवेत लटकलेली होती.’
ऑ- संदीप १९ तास ट्रॉलीत अडकून पडला हाेता.