...म्हणून दरोडा टाकून चोरांनी बँकेतील केवळ चिल्लर चोरली, पोलिसांनी 12 तासांत लावला छडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 12:01 PM2017-08-25T12:01:26+5:302017-08-25T12:09:23+5:30
चोरी करताना त्यांनी बॅंकेतील केवळ चिल्लरवरच हात साफ केला होता. मात्र त्यांनी 2000 रूपयांच्या नोटांना हातही नाही लावला.
दिल्ली, दि. 25 - राजधानी दिल्लीतील सिंडिकेट बँकेच्या शाखेतील दरोड्याप्रकरणाचा दिल्ली पोलिसांनी केवळ 12 तासांमध्ये छडा लावून तीन जणांना अटक केली आहे. हे तिघेही दिल्लीच्या परिवहन विभागात काम करतात. तिघेही आरोपी उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील रहिवासी आहेत.
मुखर्जीनगरमधील सिंडिकेट बँकेच्या शाखेत या तिघांनी चोरी केली होती. चोरी करताना त्यांनी बॅंकेतील केवळ चिल्लरवरच हात साफ केला होता. मात्र त्यांनी 2000 रूपयांच्या नोटांना हातही नाही लावला. पोलिसांनी त्यांच्याकडून 2 लाख 30 हजार रुपयांचे पाच आणि दहा रुपयांचे डॉलर हस्तगत केले आहेत. एवढी चिल्लर ते एकूण 46 पिशव्यांमधून घेऊन गेले होते, अशी माहितीही त्यांनी चौकशीत दिली आहे.
हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नवीन नोटांमध्ये जीपीएस चीप बसवण्यात आली असल्याच्या अफवेमुळे या चोरांनी 2000 रूपयांच्या नोटांना हातही नाही लावला.. नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या नवीन नोटांमध्ये जीपीएस चीप बसवण्यात आल्याच्या अफवेमुळे त्यांनी नोटांऐवजी चिल्लर पळवल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
कशी केली चोरी-
-चित्रपट आणि मालिका पाहून त्यांनी बँकेत चोरी करण्याचा कट आखला होता.
- एका वर्कशॉपमधून कटर खरेदी केला होता.
- त्यांनी बँकेच्या कार्यालयाची खिडकी तोडून आत प्रवेश केला आणि चिल्लर पळवली.
कसा लावला 12 तासांमध्ये छडा-
- बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ही चोरीची घटना कैद झाली होती.
- त्यात दोघांनी तोंडावर रुमाल बांधले होते. पण त्यातील एकाच्या हातावर टॅटू होता.
- बस डेपोच्या बाजूची खिडकी तोडलेली असल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांकडे सुरुवातीला चौकशी केली.
- त्यावेळी एका तरुणाच्या हातावर टॅटू दिसला. यावरून त्याला ताब्यात घेतले आणि त्याने चोरीची कबुली दिली.