१६ अपात्र आमदार भाजपामध्ये; १३ जणांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 04:47 AM2019-11-15T04:47:32+5:302019-11-15T04:48:20+5:30

अपात्र ठरविलेल्या आमदारांना ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुका लढविण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केल्यानंतर त्यापैकी १६ आमदारांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

3 ineligible MLAs in BJP; 2 candidates | १६ अपात्र आमदार भाजपामध्ये; १३ जणांना उमेदवारी

१६ अपात्र आमदार भाजपामध्ये; १३ जणांना उमेदवारी

Next

बंगळुरू : कर्नाटकच्या तत्कालीन विधानसभाध्यक्षांनी अपात्र ठरविलेल्या आमदारांना ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुका लढविण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केल्यानंतर त्यापैकी १६ आमदारांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, काँग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना मात्र भाजपमध्ये घेण्यात आलेले नाही. त्यांच्या प्रवेशानंतर १६ पैकी १३ जणांना भाजपने पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली. कर्नाटकमधील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होणार असून, त्यात जास्तीत जास्त आमदारांना निवडून आणण्याचे ध्येय भाजपने ठेवले आहे. राज्यातील भाजप सरकारला बहुमतासाठी आणखी सहा आमदारांची गरज आहे.
शिवाजीनगर मतदारसंघातील अपात्र ठरविण्यात आलेले आमदार रोशन बेग यांची आयएमए गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू असून, त्यामुळे भाजप नेतृत्वाने आपल्या पक्षात प्रवेश नाकारला असल्याचे सूत्रांनी सांगितले. आपण सात आमदारांसह भाजपमध्ये जाणार आहोत, असे रोशन बेग यांनीच सांगितले होते.
कर्नाटकातील तत्कालीन विधानसभाध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी काँग्रेस व जनता दल (एस)च्या १७ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याचा घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कायम
राखला.
कर्नाटकच्या विद्यमान विधानसभेची मुदत २०२३ साली संपत असून, तोपर्यंत या अपात्र आमदारांना निवडणुका लढविण्यास विधानसभाध्यक्षांनी घातलेली बंदी मात्र सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केली. (वृत्तसंस्था)
>हे आहेत भाजपमध्ये दाखल झालेले आमदार
काँग्रेसच्या प्रताप गौडा पाटील, बी. सी. पाटील, शिवराम हेब्बर, एस. टी. सोमशेखर, ब्रायती बसवराज, आनंद सिंह, एन. मुनिरत्न, के. सुधाकर, एमटीबी नागराज, श्रीमंत पाटील, रमेश जर्किहोली, महेश कुमातल्ली, आर. शंकर तर जनता दल (एस)च्या के. गोपालिया, ए. एच. विश्वनाथ, के. सी. नारायण गौडा या सोळा अपात्र आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शरद बाचेगौडा या भाजपच्या बंडखोर आमदाराने अपक्ष म्हणून पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून, त्याला जनता दल (एस)ने पाठिंबा देण्याचे ठरविले आहे.

Web Title: 3 ineligible MLAs in BJP; 2 candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.