पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यास नकार दिल्यामुळे 3 काश्मिरी तरुणांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 07:47 PM2021-11-11T19:47:28+5:302021-11-11T19:47:37+5:30
याप्रकरणी काश्मिरी तरुणांनी तक्रर दाखल केली असून, पोलिस आरोपीच्या शोधात आहेत.
रांची:झारखंडच्या रांचीमध्ये 3 काश्मिरी तरुणांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. हे तिन्ही तरुण दोरंडा पोलिस ठाणे हद्दीत राहतात. गुरुवारी बिलाल अहमद, सब्बीर अहमद आणि वसीम अहमद यांनी दोरांडा पोलिस ठाण्यात मारहाण झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोरांडा येथील सोनू कुमार नावाच्या तरुणाने बिलाल, सब्बीर आणि वसीमला पाकिस्तान मुर्दाबाद आणि काश्मीर झिंदाबादच्या घोषणा देण्यास सांगितले. पण, या तिघांनी अशा घोषणा देण्यास नकार दिल्यामुळे तिघांना मारहाण करत शहर सोडून जाण्याची धमकी देण्यात आली, अशी माहिती या तिघांनी आपल्या तक्रारीत दिली आहे.
रांचीमध्ये 20 वर्षांपासून व्यवसाय करत आहे
बिलाल अहमद यांनी सांगितले की, गेल्या 20 वर्षांपासून ते रांचीच्या डोरंडा भागात भाड्याच्या घरात राहत आहे. थंडीच्या काळात काश्मीरमधून लोकरीचे कपडे रांचीत आणून विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून स्थानिक तरुण त्यांना रोज धमकावत आहेत.
कारवाईची तयारी सुरू
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे दोरंडा पोलिस स्टेशनचे प्रभारी रमेश कुमार सिंह यांनी सांगितले. तसेच पुढील कार्यवाही सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तरुणाला अटक केली जाईल. पोलिस चौकशीसाठी आरोपी तरुण सोनूच्या घरीही गेले होते, मात्र तो तिथे सापडला नाही. प्राथमिक तपासात त्याला अंमली पदार्थांचे व्यसन असल्याचे निष्पन्न झाले आहे.