देशात कोरोनाचे ३ लाख ८२ हजार ३१५ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 06:25 AM2021-05-06T06:25:37+5:302021-05-06T06:26:19+5:30
देशात २० लाख कोरोना रुग्णांची संख्या ७ ऑगस्ट रोजी, ३० लाख २३ ऑगस्ट रोजी, ५ सप्टेंबर रोजी ४० लाख तर १६ सप्टेंबर रोजी ५० लाख झाली होती.
नवी दिल्ली : देशात बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे तीन लाख ८२ हजार ३१५ नवे रुग्ण नोंद झाले तर तीन हजार ७८० रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या आता दोन लाख २६ हजार १८८ तर एकूण रुग्णांची संख्या २,०६,६५,१४८ झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या ३४ लाख ८७ हजार २२९ आहे. एकूण बाधितांच्या संख्येत या रुग्णांचे प्रमाण १६.८७ टक्के आहे तर बरे होण्याचे प्रमाण ८२.०३ टक्के आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक कोटी ६९ लाख ५१ हजार ७३१ आहे तर मृत्यूचे प्रमाण घसरून १.०९ टक्के झाले आहे.
देशात २० लाख कोरोना रुग्णांची संख्या ७ ऑगस्ट रोजी, ३० लाख २३ ऑगस्ट रोजी, ५ सप्टेंबर रोजी ४० लाख तर १६ सप्टेंबर रोजी ५० लाख झाली होती. २८ सप्टेंबर रोजी ६० लाख, ११ ऑक्टोबर रोजी ७० लाख, २९ ऑक्टोबर रोजी ८० लाख, २० नोव्हेंबर रोजी ९० लाख आणि १९ डिसेंबर रोजी १ कोटीची संख्या ओलांडली. ४ मे रोजी देशाने दोन कोटी रुग्णसंख्या गाठली.
तामिळनाडूत चार तासात १० कोरोना रुग्णांचा मृत्यू
चेंगलपट्टू (तामिळनाडू) : चेंगलपट्टू सरकारी रुग्णालयात मंगळवारी रात्री चार तासात दहा कोविड रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यांच्या नातेवाईकांनी, रुग्णालयात प्राणवायूची टंचाई असल्यामुळे हे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. चेंगलपट्टू जिल्ह्यात रोज सरासरी १५०० कोरोना रुग्णांची नोंद होत असून चेंगलपट्टू सरकारी रुग्णालयात जवळपास ५०० कोविड-१९ रुग्णांवर उपचार सुरू असल्यामुळेे द्रवरूप प्राणवायूची मागणी खूप वाढली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट दिल्यानंतर तासाभरात ऑक्सिजनचा टँकर रुग्णालयात दाखल झाला.
२० मेपर्यंत निर्बंध
किती कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, हे शोधण्याचे काम सुरू असून प्राणवायूची टंचाई नाही, असा दावा अधिकाऱ्यांनी केला. कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे तमिळनाडूत सर्व राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर २० मेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.