विवाह मोसमात या वर्षी 3 लाख कोटींची उलाढाल; दोन महिन्यांत वाजणार २५ लाख सनई-चौघडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 09:02 AM2021-11-11T09:02:19+5:302021-11-11T09:02:40+5:30
कोरोना साथीच्या काळात आजवर मुहूर्ताचे खूप कमी दिवस असल्याने, तसेच प्रतिबंधक नियमांमुळे विवाह हे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडले.
नवी दिल्ली : कोरोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर, यंदा दिवाळीत अनेकांचा व्यवसाय चांगला झाला. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत देशभरात सुमारे २५ लाख विवाह होणार असून, त्यामुळे ३ लाख कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात, कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) या संघटनेने म्हटले आहे की, येत्या रविवारी, १४ नोव्हेंबर रोजी देव उठाण एकादशी असून, त्या दिवसापासून सुरू झालेला विवाह हंगाम १३ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. त्या काळात विवाह समारंभासाठी होणारी पूर्वतयारी, खरेदी यातून सुमारे ३ लाख कोटी रुपयांची उलाढाल होईल.
कोरोना साथीच्या काळात आजवर मुहूर्ताचे खूप कमी दिवस असल्याने, तसेच प्रतिबंधक नियमांमुळे विवाह हे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडले. त्यामुळे विवाहासाठी रोषणाई, मोठाले मंडप, कॅटरिंगवाले अशा अनेक लोकांचे रोजगार बुडाले होते. सीएआयटीचे अध्यक्ष बी. सी. भाटिया यांनी सांगितले की, दिवाळीच्या आधी घराची दुरुस्ती व रंगरंगोटी यातून खूप मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे, विवाह मोसमात दागिने, साड्या, लेहेंगा-चुन्नी, आयते कपडे, सुका मेवा, मिठाई, चप्पल, अन्नधान्य, रोषणाईचे सामान, इलेक्ट्रिक सामान, भेटवस्तू आदी गोष्टींना खूप मागणी असते. हॉटेल, लॉन, फार्म हाऊस, सभागृहे अशा अनेक ठिकाणी विवाह सोहळे पार पडतात. त्यासाठी जाणाऱ्या लोकांना कॅब, बस अशा गोष्टींची सेवा लागते. व्हिडीओग्राफर, फोटोग्राफर, बँडाबाजावाले, सनईवाले, जीडे अशा अनेक लोकांना त्यातून काम मिळते असेही भाटिया म्हणाले.
विवाहखर्च प्रत्येकी २ लाख ते १ कोटी
यंदा होणाऱ्या विवाहांपैकी ५ लाख विवाहांचा खर्च प्रत्येकी २ लाख रुपये असेल. त्याशिवाय आणखी काही लाख विवाहांचा खर्च प्रत्येकी ५ लाख, २५ लाख किंवा ५० लाख रुपये देखील असेल. काही हजार विवाहांसाठी प्रत्येकी १ कोटी रुपये खर्च येईल असेही सीएआयटीने म्हटले आहे.