दर तासाला ३ खून अन् दिवसाला ७८ हत्या; देशातील गुन्ह्यांची धक्कादायक आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 06:53 AM2023-12-05T06:53:08+5:302023-12-05T06:53:29+5:30
महिलांवर प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांची १८.७ टक्के प्रकरणे दाखल झाली असून, ७.१ टक्के प्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : २०२२ मध्ये देशभरात २८ हजार ५२२ खुनांच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून, प्रत्येक दिवशी ७८ हत्या झाल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या क्राइम इन इंडिया या अहवालातून समोर आले आहे.
देशभरात महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) यांच्यावरील गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे ४ टक्के, ८.७ टक्के, ९.३ टक्के, १३.१ टक्के आणि १४.३ टक्के वाढ झाली आहे, तर आर्थिक गुन्ह्यांमध्ये ११.१ टक्के वाढ झाली आहे. अहवालानुसार, देशभरात भ्रष्टाचार १०.५ टक्क्यांनी वाढला असून, सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल २४.४ टक्के वाढ झाली आहे.
महिलांवरील अत्याचारात किती वाढ?
२०२२ मध्ये महिलांवरील अत्याचारात २०२१ च्या तुलनेत ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२२ मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या ४ लाख ४५ हजार २५६ गुन्ह्यांची नोंद झाली असून, २०२१ मध्ये हे प्रमाण ४,२८,२७८ इतके होते. पती किंवा त्यांच्या नातेवाइकांकडून छळ होत असल्याची प्रकरणे सर्वाधिक ३१.४ टक्के असून, अपहरणाची प्रकरणे १९.२ टक्के आहेत. महिलांवर प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांची १८.७ टक्के प्रकरणे दाखल झाली असून, ७.१ टक्के प्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलांचा किती छळ?
२०२२ मध्ये १,६२,४४९ मुलांच्या छळाच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. २०२१ मध्ये हेच प्रमाण १,४९,४०४ इतके होते. २०२२ मध्ये यात ८.७ टक्के इतके झाले आहे. यातील बहुतांश गुन्हे अपहरणाशी (४५.७ टक्के) संबंधित आहेत.
वृद्धांनीही सावध राहण्याची गरज
२०२१ मध्ये ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले करणे, त्यांची फसवणूक करण्याचे २६,११० गुन्हे दाखल झाले होते. यात तब्बल ९.३%ने वाढ होत हे प्रमाण ३८,५४५ इतके झाले आहे. यापैकी बहुतांश गुन्हे चोरी, फसवणूक करणे या संदर्भातील आहेत.
अनुसूचित जाती, जमातींवरील हल्ले वाढे
अनुसूचित जातींमधील नागरिकांवर केलेल्या हल्ल्यात २०२२ मध्ये १३.१ %ने वाढ झाली आहे. २०२१ मध्ये असे गुन्हे ५०,९०० होते, त्यात वाढ होत यातील गुन्ह्यांचे प्रमाण ५७,५८२ इतके झाले आहे. अनुसूचित जमातीमधील नागरिकांवरील हल्ल्यांत १३.३%ने वाढ झाली आहे.