3 राज्यांमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? पुढच्या आठवड्यात जाहीर होतील नावे...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 10:04 PM2023-12-08T22:04:57+5:302023-12-08T22:06:29+5:30
मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी भाजपने तिन्ही राज्यांसाठी केंद्रीय निरीक्षकांची निवड केली आहे.
3 States CM Names: भारतीय जनता पक्षाने (BJP) शुक्रवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांची राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे तिघे या तीन राज्यातील मुख्यमंत्र्याची निवड करणार आहेत. सोमवारी मध्य प्रदेशच्या भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक आणि रविवारी छत्तीसगड आणि राजस्थान भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होण्याची शक्यता आहे.
पक्षाने जारी केलेल्या निवेदनानुसार, राजनाथ सिंह यांच्याशिवाय राज्यसभा सदस्या सरोज पांडे आणि पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांची राजस्थानमधील विधीमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्वजण रविवारी जयपूरला जाणार असून, तिथे मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा होणार आहे.
दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे यांच्या दाव्याकडे पक्ष दुर्लक्ष करून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याकडे राज्याची जबाबदारी सोपवू शकतो, अशी जोरदार चर्चा भाजपमध्ये आहे. तिकडे, खट्टर यांच्यासोबत पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रमुख के. लक्ष्मण आणि राष्ट्रीय सचिव आशा लाक्रा हे मध्य प्रदेशच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत, तर मुंडा यांच्यासह केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि भाजपचे सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम हे छत्तीसगडचे केंद्रीय निरीक्षक असतील. येत्या दोन दिवसांत तिन्ही राज्यात बैठका होणार असून, पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.