अयोध्येतील राम मंदिरातील पुजारी पदासाठी ३ हजार अर्ज; मुलाखतीसाठी २०० जणांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 01:30 PM2023-11-21T13:30:19+5:302023-11-21T13:30:51+5:30
अयोध्येत बनणाऱ्या राम मंदिरातील पूजा पद्धत ही सध्याच्या पद्धतीपेक्षा वेगळी असेल. ही पद्धत रामानंदीय संप्रदायानुसार होईल.
अयोध्या - पुढील वर्षी भव्य जल्लोषात अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी राम मंदिरातील पुजारी पदासाठी आतापर्यंत ३ हजार अर्ज आले होते. त्यातील २०० उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले. मकर संक्रांतीनंतर २२ जानेवारी २०२४ रोजी रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान होतील.
ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी म्हटलं की, २०० उमेदवारांची त्यांच्या पात्रतेनुसार मुलाखतीसाठी निवड करण्यात आली आणि त्यांना ट्रस्टकडून मुलाखतीसाठी बोलावले. या सर्वांच्या मुलाखती विश्व हिंदू परिषदेच्या मुख्यालयात कारसेवक पूरममध्ये होत आहेत. वृंदावनचे जयकांत मिश्रा, अयोध्येतील दोन महंत मिथिलेश नंदिनी शरण आणि सत्यनारायण दास यांच्या ३ सदस्यीय पॅनेलकडून या उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत असं त्यांनी सांगितले.
सर्व उमेदवार होऊ शकतात ट्रेनिंगमध्ये सहभागी
या २०० उमेदवारांमधून २० जणांची निवड करण्यात येईल. निवडलेल्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर पुजारी म्हणून नियुक्त करण्यात येईल त्याचसोबत विविध पदांवर निवड केली जाईल. विशेष म्हणजे ज्या लोकांची निवड झाली नाही अशांनाही ट्रेनिंगमध्ये सामावून घेण्यात आले आहे. या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येतील. या उमेदवारांना भविष्यात संधी दिली जाऊ शकते. उमेदवारांचे ट्रेनिंग ज्येष्ठ संतांद्वारे तयार धार्मिक अभ्यासक्रमाआधारे घेतले जाईल. ट्रेनिंग काळात उमेदवारांना मोफत जेवण, निवासस्थान आणि २ हजार रुपये भत्ता मिळेल.
या मुलाखतीत उमेदवारांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यात संध्या वंदन काय आहे? या विधी कशा होतात, त्या पूजेसाठी कोणता मंत्र आहे? प्रभू रामाच्या पूजेसाठी कोणता मंत्र आहे, त्यासाठी कर्मकांड काय आहे? या प्रकारचे प्रश्न उमेदवारांना मुलाखतीत विचारण्यात आले.
रामानंदीय संप्रदायानुसार होणार पूजा
अयोध्येत बनणाऱ्या राम मंदिरातील पूजा पद्धत ही सध्याच्या पद्धतीपेक्षा वेगळी असेल. ही पद्धत रामानंदीय संप्रदायानुसार होईल. या पूजेसाठी विशेष अर्चक असतील. आतापर्यंत रामजन्मभूमी संकुलात असलेल्या तात्पुरत्या मंदिरात पूजा करण्याची पद्धत अयोध्येतील इतर मंदिरांप्रमाणेच पंचोपचार पद्धत आहे. त्यात देवाला अन्न अर्पण करणे, नवीन वस्त्रे परिधान करणे, नंतर नेहमीची पूजा आणि आरती यांचा समावेश असेल.परंतु २२ जानेवारी २०२४ ला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर सर्वकाही बदलेल. मुख्य पुजारी, सहायक पुजारी आणि सेवकांना रामानंदीय पूजा पद्धतीत रामललाची पूजा करण्याची तरतूद असेल.यामध्ये वस्त्र परिधान करण्याच्या पद्धतीसह पूजेच्या अनेक गोष्टी निश्चित केल्या जाणार आहेत. हनुमान चालिसाप्रमाणेच रामललाची स्तुती करण्यासाठी नवीन पोथी (पुस्तक) असेल. ज्याची रचना करण्यात आली असून ती अंतिम टप्प्यात आहे.