३० कोटी लोकांचे ‘दम मारो दम’, जगात अमली पदार्थांची मागणी वाढली; इंजेक्शन टाेचून घेण्याच्या प्रमाणात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 07:05 AM2023-06-27T07:05:22+5:302023-06-27T07:05:46+5:30
Narcotics: जगभरात अमली पदार्थांचे उत्पादन, तस्करी आणि वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे लोकांना विविध आजार जडण्याचे प्रमाणही वाढले आहे.
न्यूयॉर्क : जगभरात अमली पदार्थांचे उत्पादन, तस्करी आणि वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे लोकांना विविध आजार जडण्याचे प्रमाणही वाढले आहे. अमली पदार्थ टोचून घेण्याचे प्रमाणही वाढले असून, स्वस्तात आणि सहज मिळणारी बेकायदा औषधे यामुळे जागतिक संकट निर्माण झाल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात म्हटले आहे. २०२१ मध्ये कोकेन घेणाऱ्यांची संख्या २३ टक्क्यांनी वाढून २९.६ कोटींवर पोहोचली आहे. २०११ मध्ये हीच संख्या २४ कोटी इतकी होती.
अमली पदार्थांच्या वाढत्या वापरामुळे आजारी पडण्याची संख्याही प्रचंड वाढली आहे. गेल्या १० वर्षांत विकारांनी ग्रस्त लोकांची संख्या ४५ टक्क्यांनी वाढून ४ कोटी इतकी झाली आहे. यातील पाच पैकी केवळ एकाला उपचार मिळाले. कोकेन उत्पादनात वाढ होऊन पुरवठा वाढला. कोकेन जप्त करण्याच्या कारवाईतही वाढ झाल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या ड्रग्ज अहवालात म्हटले आहे.
अमली पदार्थ कुठे जास्त घेतात?
अमेरिका, पश्चिम व मध्य युरोपमध्ये अमली पदार्थ विक्रीची मोठी बाजारपेठ असली तरी ऑस्ट्रेलियामध्येही अमली पदार्थांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. आफ्रिका, आशियामध्येही बाजारपेठा वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
महिला का करतात नशा?
कमी उत्पन्न, कमी बचत आणि जास्त धोका. नोकरीच्या कमी संधी. कुटुंबाची अतिरिक्त जबाबदारी. घरगुती हिंसाचार
एचआयव्हीचा धोका किती?
जे स्वत: ड्रग्ज टोचून घेतात ३५ पट
ट्रान्सजेंडर महिला ३४ पट
महिला सेक्स वर्कर २६ पट
समलिंगी पुरुष २५ पट
२०१४ नंतर अमली पदार्थ जप्तीत ३० पट वाढ
अमली पदार्थांविरुद्धच्या कारवाईमुळे २००६-१३ मध्ये ७६८ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले
होते, तर २०१४ ते २०२२ दरम्यान ही जप्ती जवळपास ३० पटीने वाढून २२ हजार कोटी रुपयांवर गेली आहे.
कुठे, काय वापरला जातो?
रशिया, युरोप : ऍम्फेटामाइन्स
भारत : ऍम्फेटामाइन्स
ब्राझील, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका : कोकेन
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार भारतातून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करेल. देशातून अमली पदार्थांची तस्करी होऊ दिली जाणार नाही.
- अमित शाह,
केंद्रीय गृहमंत्री