लॉकरमधून ३० कोटी रुपये जप्त, हवाला रॅकेटचा पैसा असल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 04:50 AM2018-12-04T04:50:12+5:302018-12-04T04:50:21+5:30
चांदणी चौकातील एका दुकानाच्या तळघरामध्ये घातलेल्या धाडीत प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना अलीबाबाची गुहाच गवसली आहे.
नवी दिल्ली : येथील चांदणी चौकातील एका दुकानाच्या तळघरामध्ये घातलेल्या धाडीत प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना अलीबाबाची गुहाच गवसली आहे. तिथे असलेल्या ४०० लॉकरपैकी ३५० लॉकरमधून रविवारपर्यंत ३० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. हवाला रॅकेटमार्फत जमविलेला हा पैसा देशात घातपाती कारवाया घडविण्यासाठी वापरला जात असावा, असा राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) संशय आहे.
चांदणी चौकातील या दुकानात सुका मेवा विकला जात असे. हे तर फक्त दाखवायचे दात होते. मात्र, खायच्या दातांचा सुगावा प्राप्तिकर खात्याला लागल्यानंतर महिनाभरापूर्वीपासून सापळा रचून अधिकाºयांनी ही कारवाई पार पाडली. दुकानातून जप्त करण्यात आलेली सर्व रक्कम दोन हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहे. दिल्लीतील तंबाखू, सुकामेवा, रसायनेविक्रेत्यांची ही रक्कम असल्याचे सांगण्यात येते. आणखी ५० लॉकर उघडायचे असून त्यातून अशीच मोठी रक्कम निघेल असा प्राप्तिकर खात्याचा अंदाज आहे. सिव्हिल लाइन्स इथे राहणाºया अशोककुमार गुप्ता याच्या मालकीचे हे दुकान शंभर वर्षे जुने आहे. त्याने २० वर्षांपूर्वी दुकानाच्या तळघरात फकीरचंद लॉकर्स अँड व्हॉल्ट हे दुसरे दुकान सुरू केले. अनेक लोक रोज या दुकानात येत व आपापल्या लॉकरमध्ये गोष्टी ठेवून जात असत. त्या नेमक्या काय होत्या हे आता धाडीतून स्पष्ट झाले आहे.
>पाकिस्तान, अफगाणिस्तानातून सुकामेवा
अशोककुमारच्या दुकानात पाकिस्तान व अफगाणिस्तान येथून सुकामेवा येत असे. त्याची बँक खाती व अन्य व्यवहारांची आता कसून चौकशी करण्यात येणार आहे.
दुबईतील हवाला आॅपरेटर पंकज कपूर याचा चांदणी चौकातील सुकामेवा दुकानातून होणाºया व्यवहारांशी जवळचा संबंध असल्याचेही बोलले जाते. गेल्या वर्षी काश्मीर, हरियाणा, दिल्ली येथे सुकामेवा विक्रेत्यांवर धाडी घालून पाकिस्तानमधून घातपाती कारवायांसाठी येणारा पैसा जप्त केला होता.