30% इन्कम टॅक्स, 20% जीएसटी, प्रॉपर्टी टॅक्स... जे वाचले त्यातून हॉस्पिटल उघडलेले; तुंबलेल्या दिल्लीवर डॉक्टरची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 07:37 PM2024-06-29T19:37:06+5:302024-06-29T19:37:27+5:30
Rain in Delhi: दिल्लीत काल रात्रीपासून सतत पाऊस पडत आहे. यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत एकूण 228.1 मिमी पाऊस झाला आहे. हा जूनमध्ये नोंदविलेला सर्वाधिक पाऊस आहे.
गेल्या काही दिवसांपासून तापलेली राजधानी दिल्ली एकाएकी आलेल्या पावसामुळे पुरती तुंबली आहे. काल पर्यंत मुंबई, चेन्नई, दुबईसारखी समुद्राशेजारी असलेली शहरे सततच्या पावसाने तुंबत होती. आता तर दिल्लीसारखी पाण्याला तरसणारी शहरे देखील तुंबू लागली आहेत एवढा पाऊस ओतत आहे. अशातच एका डॉक्टरची उद्विग्न प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
डॉ गौरव दीक्षित यांनी ही पोस्ट एक्स वर टाकली आहे. दिल्लीतील पॉश जीके भागात माझ्या पत्नीने क्लिनीक उघडले होते. हे क्लिनिक ३० टक्के आयकर, २० टक्के जीएसटी, प्रॉपर्टी टॅक्स, रोड टॅक्स, सेस आदी कर भरून जे पैसे उरतात त्यातून चालू केले होते. देशातील ८० कोटी लोकसंख्येला मोफत रेशन, देशउभारणीसाठी आम्ही जे करायचे ते करतोय, तरीही सरकारचे पुरेसे आभारही मानू शकत नाहीय, असे दीक्षित यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीच्या क्लिनिकमध्ये घुसलेले पाणी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या क्लिनिक बाहेरचा फोटो त्यांनी पोस्ट केला आहे. पाणी अगदी पार कंबरेच्या वरपर्यंत आलेले आहे. त्यांच्या पत्नीचे अल्ट्रसाऊंड, कॉस्मेटिक आणि डेंटल क्लिनिक आहे. यामध्ये करोडो रुपयांची यंत्रसामग्री वापरली जाते. ती चिखलाच्या पाण्यात गेलेली आहे. या झालेल्या नुकसानीला त्यांनी उद्विग्न होत आपल्या शब्दांत मांडले आहे.
My wife’s clinic in ‘posh’ GK in Delhi.
— Gaurav Dixit (@dixit_hemat) June 29, 2024
Built after whatever left post 30% income tax, 20% GST, property tax, Road tax, cess..
Doing my best to build the nation and help 80cr people with free ration.
Can’t thank government enough.
Grateful 🙏🏼 pic.twitter.com/XypwhWsmZS
दिल्लीत काल रात्रीपासून सतत पाऊस पडत आहे. यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत एकूण 228.1 मिमी पाऊस झाला आहे. हा जूनमध्ये नोंदविलेला सर्वाधिक पाऊस आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवसांत दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.