सीमेवर ३० मीटर लांबीचे भुयार !
By admin | Published: March 5, 2016 02:39 AM2016-03-05T02:39:57+5:302016-03-05T02:39:57+5:30
जम्मू जिल्ह्याच्या आर.एस.पुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकिस्तानकडून भारतीय क्षेत्रापर्यंत खोदण्यात आलेल्या ३० मीटर लांबीच्या भुयाराचा छडा लावला.
जम्मू : जम्मू जिल्ह्याच्या आर.एस.पुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकिस्तानकडून भारतीय क्षेत्रापर्यंत खोदण्यात आलेल्या ३० मीटर लांबीच्या भुयाराचा छडा लावला. बीएसएफचे हे फार मोठे यश असून जम्मू क्षेत्रात दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याच्या हेतूनेच हे भुयार खोदण्यात आले होते असे दलाने स्पष्ट केले आहे.
या क्षेत्रात २०१२ पासून आतापर्यंत बीएसएफने शोधून काढलेले हे चौथे भुयार आहे. दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की, गेल्या महिनाभरापासून आम्ही शोध मोहीम राबवित होतो. त्यादरम्यान गुरुवारी रात्री आम्हाला हे भुयार आढळले. हे भुयार जेसीबीच्या मदतीने खोदण्यात येत होते. सीमेपलीकडून काही हालचाली सुरू असल्याचा संशय सुरक्षा दलाला आला होता. रात्री उशिरापर्यंत आवाज ऐकू येत होते. लोक सीमेपलिकडील चौकीतून येताना दिसत होते. हे भुयार जवळपास १० फूट खोल आणि ३० मीटर लांब आहे. (वृत्तसंस्था)
विशेष म्हणजे हे भुयार एका बाजूनेच उघडे होते. भारतीय हद्दीत त्यातून बाहेर पडण्याचे दार नव्हते कारण त्याचे काम पूर्ण झाले नव्हते.
घुसखोरीचा हेतू
जम्मू क्षेत्रात दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याच्या हेतूने पाकिस्तानच्या बाजूने हे भुयार खोदण्यात आले होते,अशी माहिती जम्मू फ्रंटियरमधील बीएसएफचे महाअधिक्षक राकेश शर्मा यांनी दिली. वेळीच याचा शोध लागला नसता तर पाकिस्तान भारतीय हद्दीत फिदायीन आणि इतर दहशतवाद्यांना घुसविण्यात यशस्वी झाला असता, असेही ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून भारताच्या गवत काढण्याच्या मोहिमेला पाकचा विरोध सुरू होता. बहुदा बीएसएफ हे भुयार शोधून काढेल असे त्याला वाटत होते.
फिरोजपूरमध्ये पाकिस्तानी घुसखोर ठार
जालंधर: पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये बीएसएफच्या जवानांनी घुसखोरी करून भारतीय हद्दीत प्रवेश करणाऱ्या एका पाकिस्तानी घुसखोरास ठार केले. मृताची ओळख अद्याप पटली नसून कारवाई सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा चौकीवर तैनात दलाच्या जवानांनी त्याला रोखून आत्मसमर्पण करण्यास सांगितले. परंतु त्याने आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे जवानांनी त्याला गोळ्या घातल्या.
> पाकिस्तानची अफजल चौकी आणि भारताच्या अल्ला माई दी कोठी चौकीच्या अगदी जवळ पोहोचलेल्या या भुयारातून एक व्यक्ती सहजपणे आत जाऊ शकत होती.
यापूर्वी बीएसएफने जुलै २०१२ मध्ये सांबा सेक्टरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर ४०० मीटर लांबीच्या सीमापार भुयाराचा छडा लावला होता. त्यानंतर मे २०१४ मध्ये चिल्लयारी सीमेजवळ २३ मीटर लांबीचे तर आॅगस्ट २०१४ ला जम्मू क्षेत्रातील पल्लनवाला सेक्टरमध्ये १३० ते १४० मीटर लांब भुयाराचा शोध लागला होता.