जगात ३० कोटी नागरिक हिपॅटायटीसच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 04:38 AM2018-08-03T04:38:19+5:302018-08-03T04:38:28+5:30
विषाणूजन्य हिपॅटायटीस नकळतपणे झालेल्या जगातील ३० कोटी नागरिकांचा शोध लावून त्यांच्यावर उपचार करण्याचे उद्दिष्ट जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) यंदा ठरविले आहे.
मुंबई : विषाणूजन्य हिपॅटायटीस नकळतपणे झालेल्या जगातील ३० कोटी नागरिकांचा शोध लावून त्यांच्यावर उपचार करण्याचे उद्दिष्ट जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) यंदा ठरविले आहे. त्यासाठी डब्ल्यूएचओतर्फे आॅनलाइन स्वरूपात ‘हिपॅटायटीस’बद्दल माहिती देणारी जागतिक यंत्रणा सादर करण्यात येत आहे. डब्ल्यूएचओचे सदस्य देशांनी या यंत्रणेत माहिती भरल्यानंतर त्याचा वापर करून विषाणूजन्य हिपॅटायटीसविरोधात लढण्याचा निर्धार संघटनेने केला आहे.
२०३०पर्यंत जगातून ‘विषाणूजन्य हिपॅटायटीस’चे समूळ उच्चाटन करण्याचे डब्ल्यूएचओचे ध्येय आहे. तसेच देशभरातील ठिकठिकाणच्या आरोग्य केंद्रांकडून विषाणूजन्य हिपॅटायटीसबद्दलची माहिती संकलित करण्याची यंत्रणाही डब्ल्यूएचओ विकसित करणार आहे. विषाणूजन्य हिपॅटायटीस हा जागतिक आरोग्याला असलेला मोठा धोका आहे. दरवर्षी या रोगामुळे १३ लाख ४० हजार नागरिकांचा मृत्यू होतो.
यकृत प्रत्यारोपण शल्य-चिकित्सक आणि हिपॅटायटीसमधील तज्ज्ञ डॉ. विक्रम राऊत यांनी सांगितले, हिपॅटायटीस बी व सी यांचे विषाणू शरीरात घेऊन फिरणाऱ्या ३० कोटी व्यक्ती शोधून काढणे गरजेचे आहे. या व्यक्तींना स्वत:लाही यकृताचे जीवघेणे आजार वा कर्करोग होण्याची शक्यता असते. तसेच काही वेळा त्यांच्या नकळत झालेल्या संसर्गामुळे इतर व्यक्तीही या आजारांना बळी पडू शकतात. सुरुवातीच्या काळात निदान झाले, तर हिपॅटायटीस बी व सी या दोन्ही आजारांवर उपचार होऊ शकतात. हिपॅटायटीस बी वर लस उपलब्ध असल्याने संबंधित व्यक्तीचा शोध घेत बरे करून या आजाराचे उच्चाटन करणे हे महत्त्वाचे आहे.
हिपॅटायटीसचे पाच प्रमुख प्रकार
हिपॅटायटीसमध्ये यकृताला सूज येते व तेथे जळजळ होते. विषाणूजन्य हिपॅटायटीस हा प्रामुख्याने ए, बी, सी, डी आणि इ या पाच प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. यातील हिपॅटायटीस बी आणि सी यांमध्ये यकृताला गंभीर इजा होते व कर्करोगाने मनुष्य मृत्युमुखी पडतो. हिपॅटायटीस बी आणि सी यांच्यामुळे मनुष्य हळूहळू मृत्यूच्या दारात जातो, त्यामुळे त्यांना ‘सायलेंट किलर्स’ असेही म्हणतात.
याचे कारण, हिपॅटायटीस बी झालेले ९० टक्के रुग्ण व हिपॅटायटीस सी झालेले ८० टक्के रुग्ण यांना त्यांच्या शरीरात हे विषाणू असल्याचे समजतही नाही. माणसाच्या शरीरातील यकृत हे ८० टक्के निकामी झाले असले, तरी त्याचे कार्य चालूच राहते. त्याच्यातील २५ टक्के चांगल्या पेशी उरल्या असल्या, तरी ते पुनर्जन्म झाल्यासारखे पुन्हा नव्याने निर्माण होते.
विषाणूजन्य हिपॅटायटीस
कसा ओळखाल
विषाणूजन्य हिपॅटायटीसमुळे यकृताला आलेल्या सुजेमुळे त्यावर चट्टे येतात व त्यातील खराब झालेल्या पेशींमुळे यकृताच्या मूळ चांगल्या पेशी नाहीशा होऊ लागतात. ही प्रक्रिया वर्षानुवर्षे सुरूच राहून त्याचे कार्य निकामी होते. मळमळणे, उलट्या, जुलाब, थकवा ही त्यातील सुरुवातीची काही लक्षणे आहेत. ही इतरही काही आजारांची लक्षणे असल्यामुळे यकृत निकामी होत असल्याचे निदान सुरुवातीला होत नाही. त्यानंतर कावीळ, रक्तस्राव, पोटात सूज, मानसिक थकवा अशी लक्षणे दिसतात.