तुरुंगातून सुटणाऱ्या नेत्याच्या स्वागताला ३0 आमदार, १३00 गाड्या
By admin | Published: September 10, 2016 03:58 AM2016-09-10T03:58:23+5:302016-09-10T07:24:18+5:30
बाहुबली नेते मोहम्मद शहाबुद्दिन यांची शनिवारी सकाळी जामिनावर सुटका होत असून, त्यांच्या स्वागताला ३0 आमदार तुरुंगाबाहेर उभे राहणार आहेत.
अनिल सिन्हा,
पाटणा- बिहारच्या सिवान मतदारसंघाचे राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार आणि बाहुबली नेते मोहम्मद शहाबुद्दिन यांची शनिवारी सकाळी जामिनावर सुटका होत असून, त्यांच्या स्वागताला ३0 आमदार तुरुंगाबाहेर उभे राहणार आहेत. एवढेच नव्हे, तर भागलपूर तुरुंगातून ते सिवानला जात असताना, त्यांच्यासोबत १३00 कारचा ताफा असेल, असे सांगण्यात आले आहे.
बिहारमध्ये जंगलराजचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहाबुद्दिन यांच्या सुटकेच्या वृत्तामुळे सिवानच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नितीशकुमार २00६ साली मुख्यमंत्री झाले, तेव्हा शहाबुद्दिन यांना दोन भावांच्या हत्येच्या आरोपावरून तुरुंगात जावे लागले. त्यानंतर पत्रकार राजीव रंजन हत्येप्रकरणात त्यांचे नाव येताच, त्यांना सिवानहून भागलपूर तुरुंगात हलवण्यात आले. आता नितीशकुमार मुख्यमंत्री असतानाच त्यांची सुटका होत आहे. त्यांच्या सरकारने न्यायालयात वेळेत आरोपपत्र न ठेवल्यामुळेच त्यांची सुटका झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. नितीशकुमार यांच्या सरकारमध्ये राजदचा सहभाग असल्यामुळेच भाजपाने हा आरोप केला, हे उघड आहे.
बिहारमध्ये जनता दल (यू) आणि राजदचे सरकार येताच, राजदचे मंत्री शहाबुद्दिन यांना भेटण्यासाठी तुरुंगात जाउ लागले, तेव्हाच आता चित्र बदलू लागल्याचे स्पष्ट झाले. दोन भावांच्या हत्या प्रकरणातील साक्षीदार तिसऱ्या भावावर अॅसिड फेकून त्याला ठार मारल्याचा आरोप शहाबुद्दिन यांच्यावर आहे. त्या प्रकरणी सहा महिन्यांत आरोपपत्र ठेवण्याचे आदेश न्यायालयाने १३ फेब्रुवारी रोजी दिले होते. ते ठेवण्यात आले नाही आणि जामिनालाही विरोध करण्यात आला नाही. एका कनिष्ठ वकिलाकडे हे प्रकरण सोपविल्यानेच शहाबुद्दिन यांची सुटका झाल्याचा आरोप भाजपाचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे.
>एके-४७सह अनेक शस्त्र लागली होती हाती
बिहारमधील पहिली एके ४७ रायफल शहाबुद्दिन यांच्या गँगकडे सापडली होती. त्यानंतर एप्रिल २00५ मध्ये त्यांच्या प्रतापपूर या गावी छापा मारायला पोलीस पथक गेले, तेव्हा त्यांच्यावर गोळीबार केला गेला. तो तब्बल ४७ तास म्हणजे दोन दिवस सुरू होता. अखेर पोलिसांनी त्यांचा ताबा मिळवला, तेव्हा त्यांच्याकडे अनेक एके ४७, पाकिस्तानी बनावटीची शस्त्रे मिळाली होती. तसेच बरीच भारतीय बनावटीची शस्त्रेही तिथे सापडली. असा नेता उद्या बाहेर येत असल्याने त्यामुळे घबराट पसरणे स्वाभाविक आहे. मात्र त्यांचे कार्यकर्ते व समर्थक खुशीत आहेत. ते तुरुंगात असतानाही राष्ट्रीय जनता दलाने त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीवर घेतले आहे. ते बाहेर आल्यावर सिवान आणि एकूणच बिहारमध्ये काय होणार आणि पुन्हा दहशत निर्माण केली जाणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.