चीनची खुमखुमी थांबता थांबेना, अरुणाचलमधील ठिकाणांना दिली आणखी ३० नवी नावेे; भारताने फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 06:47 AM2024-04-02T06:47:44+5:302024-04-02T06:48:06+5:30
India-China News: भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशवर हक्क सांगत चीनने त्या राज्यातील ठिकाणांना आणखी ३० नवी नावे दिली आहेत. अशा नवीन नावांच्या चार याद्या चीनने आतापर्यंत प्रसिद्ध केल्या.
बीजिंग - भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशवर हक्क सांगत चीनने त्या राज्यातील ठिकाणांना आणखी ३० नवी नावे दिली आहेत. अशा नवीन नावांच्या चार याद्या चीनने आतापर्यंत प्रसिद्ध केल्या. अरुणाचल प्रदेशचा मुद्दा उकरून काढून चीनने गेल्या काही आठवड्यांत अनेक कुरापती केल्या. त्या देशाचे दावे भारताने फेटाळून लावले आहेत.
भारताने म्हटले आहे की, चीनने अरुणाचल प्रदेशबद्दल कितीही कांगावा केला तरी त्याने वस्तुस्थिती बदलत नाही. अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग आहे व यापुढेही राहणार आहे. त्यामुळे त्या राज्यातील ठिकाणांना चीनने दिलेली नवी नावे निरर्थक ठरतात.
नवी नावे येत्या १ मेपासून
चीनने अरुणाचल प्रदेशला झांगनान असे नाव दिले असून तो दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. यासंदर्भात चीनच्या नागरी घडामोडी मंत्रालयाने आपल्या वेबसाइटवर अरुणाचल प्रदेशमधील ठिकाणांना दिलेली आणखी ३० नवी नावे प्रसिद्ध केली आहेत. ही नवी नावे येत्या १ मेपासून प्रचलित होतील, असा दावाही चीनने केला आहे.
चीनने आजवर प्रसिद्ध केल्या ४ याद्या
- अरुणाचल प्रदेशवर हक्क सांगत तेथील सहा ठिकाणांना नवी नावे देण्याची चीनने आगळीक केली होती. तशी पहिली यादी त्या देशाने २०१७ साली प्रसिद्ध केली.
- २०२१ साली प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या यादीत १५, तर २०२३ मध्ये तिसऱ्या यादीत ११ ठिकाणांना चीनने नवीन नावे देऊन भारताची कुरापत काढली होती. आता त्या देशाने चौथी यादी प्रसिद्ध केली आहे.
चीन-भारतातील तणाव कायम
पूर्व लडाखमधील सीमाप्रश्नावरून भारत व चीन यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर हा तणाव आणखी वाढला होता. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून दोन्ही देशांचे लष्कर मागे घेण्याच्या मुद्द्यावरून चीनने अडवणुकीची भूमिका घेतली आहे. अरुणाचल प्रदेशवर हक्क सांगत चीन भारताच्या कुरापती काढत आहे.
केंद्रातील भाजप सरकारने बांगलादेशला १५ हजार एकर जमीन का दिली? भाजपचे केंद्र सरकार श्रीलंकेशी युद्ध करून कच्चाथीवू बेट परत ताब्यात घेणार आहे का? भाजप सरकारने चीनला हजारो किमी जमीन का दिली.
- पवन खेडा, काँग्रेस नेते.
अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे व भविष्यातही राहणार आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनला सुनावले आहे. अरुणाचल प्रदेशमधील ठिकाणांची नावे बदलून चीनच्या हाती काहीही लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले. ~ - एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री
चीनची बांगलादेशला मदत
चीनच्या मदतीने बांगलादेशमध्ये पाणबुड्यांसाठी तळ बनविण्याला जात असून, त्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. या तळाची उपग्रहाने टिपलेली छायाचित्रे भारताची चिंता वाढविणारी आहेत. एका छायाचित्रात ड्राय डॉक दिसत असून, तिथे पाणबुड्यांच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.
बांगलादेशातील कॉक्स बाजार येथील पेकुआ येथे बीएनएस शेख हसीना या नावाचा पाणबुडीतळ बांधण्यात आला आहे. तिथे चीनच्या पाणबुड्यांच्या दुरुस्तीचे काम होईल.