३० टक्के कुकींना हवाय मणिपूरचा ६० टक्के भूप्रदेश; सततच्या हिंसेनंतर वेगळ्या राज्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 11:28 AM2023-08-28T11:28:03+5:302023-08-28T11:36:53+5:30
मणिपूरचे विभाजन करून वेगळे कुकीलँड राज्य निर्माण करण्याची मागणी आता या समाजाकडून होऊ लागली आहे.
मणिपूरमध्ये ४ महिन्यांपासून हिंसाचार सुरुच आहे. लोकसभेतही मुद्दा उपस्थित करून त्याचा फारसा उपयोग झालेला नाहीय. आजही तेथील लाखो लोक सरकारी आसरा केंद्रांत राहत आहेत. कुकी समाजाने आता वेगळ्या राज्याची मागणी लावून धरली आहे. मैतेई समाजासोबत राहणे आमच्यासाठी मृत्यू समान असल्याचे कुकी समाजाचे म्हणणे आहे.
मणिपूरचे विभाजन करून वेगळे कुकीलँड राज्य निर्माण करण्याची मागणी आता या समाजाकडून होऊ लागली आहे. यातच २९ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन सुरु होत आहे, त्यातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत याचा उल्लेख केला होता. राज्यात वेगळ्या प्रशासनाची मागणी आहे, पण मणिपूरच्या प्रादेशिक अखंडतेशी आम्ही तडजोड करणार नाही, असे ते म्हणाले होते.
1972 मध्ये मणिपूर पूर्ण राज्य बनले. यानंतर सुमारे 8 वर्षांनी म्हणजे 1980 मध्ये स्वतंत्र कुकीलँडची मागणी सुरू झाली. त्यावेळी कुकी-झोमी बंडखोरांची पहिली आणि सर्वात मोठी संघटना कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन म्हणजेच KNO अस्तित्वात आली होती. 2012 मध्ये वेगळ्या तेलंगणा राज्याची मागणी मान्य होणार हे कळताच कुकी राज्य मागणी समिती म्हणजेच KSDC संघटनेने कुकीलँडसाठी आंदोलनाची घोषणा केली. तेव्हापासून ही संघटना वेळोवेळी संप आणि बंद पुकारत मणिपूरमध्ये मालवाहतूक रोखण्याचे काम केले जात आहे.
मणिपूर 22,327 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. KSDC ने 60% पेक्षा जास्त म्हणजे 12,958 किमी क्षेत्र कुकीलँड बनवण्याची मागणी केली आहे. कुकीलँडमधील सदर हिल्स इंफाळ खोऱ्याला तीन बाजूंनी वेढतात. मणिपूरमधील कुकी समाज प्रामुख्याने डोंगररांगांत राहतो. मणिपूरची एकूण लोकसंख्या २८.५ लाख आहे, त्यापैकी ३०% कुकी आहेत.