कोरोना परतीच्या वाटेवर? एका दिवसात केवळ १४,१४६ नवे रुग्ण; ३० टक्के नागरिकांचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 10:23 AM2021-10-18T10:23:56+5:302021-10-18T10:24:28+5:30

देशात सद्यस्थितीत केवळ ३० टक्के नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. त्यामुळे काेराेनाविरुद्ध आपले युद्ध सुरूच असून, काेणत्याही प्रकारची ढील देऊ नका, असा सल्लावजा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

30 percent population in india fully vaccinated | कोरोना परतीच्या वाटेवर? एका दिवसात केवळ १४,१४६ नवे रुग्ण; ३० टक्के नागरिकांचे लसीकरण

कोरोना परतीच्या वाटेवर? एका दिवसात केवळ १४,१४६ नवे रुग्ण; ३० टक्के नागरिकांचे लसीकरण

Next

नवी दिल्ली : देशात रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात कोरोनाचे नवे १४,१४६ रुग्ण आढळले तर १४४ जणांचा मृत्यू झाला. देशात कोरोनामुळे आतापर्यंत मरण पावलेल्यांची एकूण संख्या ४,५२,१२४ झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. देशात लसीकरणाची १०० काेटी डाेसकडे वाटचाल सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी हाेताना दिसत आहे. मात्र, अधूनमधून रुग्णसंख्या वाढत असल्याचेही आढळते. देशात सद्यस्थितीत केवळ ३० टक्के नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. त्यामुळे काेराेनाविरुद्ध आपले युद्ध सुरूच असून, काेणत्याही प्रकारची ढील देऊ नका, असा सल्लावजा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या १,९५,८४६ असून एकूण बाधितांच्या संख्येत हे प्रमाण ०.५७ टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१० टक्के आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत गेल्या २४ तासात ५,७८६ ने घट झाली. देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत ९७.६५ कोटी कोविड लस मात्रा दिल्या गेल्या आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

शनिवारी ११,००,१२३ चाचण्या केल्या गेल्या. त्यामुळे देशात एकूण चाचण्यांची संख्या ५९,०९,३५,३८१ झाल्या. कोरोनातून आतापर्यंत ३,३४,१९,७४९ लोक बरे झाले असून रुग्ण मरण पावण्याचा दर हा १.३३ टक्के आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने २० लाखांचा टप्पा ७ ऑगस्ट, २०२० रोजी पूर्ण केला होता. ३० लाखांचा २३ ऑगस्ट, ४० लाखांचा ५ सप्टेंबर तर १६ सप्टेंबर, २०२० रोजी ५० लाखांची पायरी ओलांडली होती. ६० लाखांचा टप्पा २८ सप्टेंबर, ७० लाखांचा ११ ऑक्टोबर, ८० लाखांचा टप्पा २९ ऑक्टोबर, ९० लाखांचा २० नोव्हेंबर आणि एक कोटींचा टप्पा १९ डिेसेंबर रोजी ओलांडला होता. 
यावर्षी ४ मे रोजी २ कोटींचा टप्पा पार केला.

देशात १८ वर्षांखालील मुलांच्या काेराेना लसीकरणाबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत संशाेधनातील निष्कर्ष आणि लसींच्या साठ्याची उपलब्धता याबाबत विचार करून परवानगी देण्यात येईल. 
- व्ही. के. पाॅल, काेविड टास्क फाेर्सचे प्रमुख  

’अधिक सवलतीबाबत निर्णय दिवाळीनंतर’ 
जालना : लसीचा एक डोस घेतल्यानंतर नागरिकांना मॉल प्रवेश, रेल्वे प्रवासाची सवलत देण्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतर आरोग्य विभाग व टास्क फोर्सशी चर्चा करून मुख्यमंत्री घेतील. दिवाळीनंतर आढळणारी बाधितांची संख्या व सेतू ॲपमध्ये व्यक्तीचे स्टेटस सेफ असणे गरजेचे असेल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. 

धोका टळलेला नाही 
भारतात १८ वर्षांवरील सुमारे ७० काेटी नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक लसीचा पहिला डाेस घेतला आहे, तर २८ काेटी नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. हे प्रमाण अनुक्रमे ७३ आणि ३० टक्के आहे. 
संपूर्ण लसीकरण झालेल्यांची संख्या कमीच असल्याने हे युद्ध संपलेले नसून काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 
काेविड टास्क फाेर्सचे प्रमुख व्ही. के. पाॅल यांनी सांगितले की, अनेक देशांमध्ये दाेनपेक्षा अधिक काेराेनाच्या लाटा आढळून आल्या आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या कमी हाेत असली तरीही वाईट काळ संपला आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. 

भीती घालविण्यासाठी खेर यांचे विशेष गाणे 
कोरोना-१९ विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या लसीबद्दल पसरलेल्या चुकीच्या कल्पना नाहीशा व्हाव्यात म्हणून गायक व संगीतकार कैलाश खेर यांनी बनवलेले गीत केंद्र सरकारने शनिवारी जारी केले. 
३.३० मिनिटांचे हे गीत आणि व्हिडिओ दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि रामेश्वर तेली यांच्या उपस्थितीत खुले करण्यात आले. 
या गीतामुळे लसीबद्दलची नकाराची भावना नाहीशी होईल आणि लस देशाला सुरक्षित राखेल, असे हरदीप सिंग पुरी यांनी ट्वीटवर म्हटले.
 

Web Title: 30 percent population in india fully vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.