अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 04:33 PM2024-09-30T16:33:35+5:302024-09-30T16:39:34+5:30
डोकेदुखीची समस्या सामान्य झाली आहे. अशा स्थितीत जर कोणी फ्री हेड मसाज देऊ केला तर त्याला नकार द्यावासा वाटत नाही.
आजच्या काळात टेन्शन आणि स्ट्रेसची कमतरता नाही. त्यामुळे डोकेदुखीची समस्या सामान्य झाली आहे. अशा स्थितीत जर कोणी फ्री हेड मसाज देऊ केला तर त्याला नकार द्यावासा वाटत नाही. समोरची व्यक्ती या कामात किती एक्सपर्ट आहे याचा विचारही आपण करत नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्नाटकातील एका ३० वर्षीय तरुणाला सलूनमध्ये हेड मसाज केल्यावर स्ट्रोक आला. अशा स्थितीत तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की डोकं दाबल्यानंतर ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो का? उत्तर आहे, होय. चुकीच्या ठिकाणी दाबल्याने मेंदूच्या मज्जातंतूंमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे स्ट्रोक येऊ शकतो.
हाऊसकीपिंगमध्ये काम करणाऱ्या या व्यक्तीला हेड मसाज करताना तीव्र वेदना जाणवल्याचं सांगितलं जातं, पण सुरुवातीला त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. मसाज केल्यानंतर काही तासांनी प्रकृती बिघडली जेव्हा बोलण्यात अडचण आली आणि डाव्या बाजूला अशक्तपणा जाणवला.
तरुणाला रुग्णालयात नेले असता, मान जोराने वळवल्यामुळे कॅरोटीड आर्टरी तुटल्याने हा स्ट्रोक आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यासाठी त्याला अँटीकोआगुलंट उपचार देण्यात आले आणि दोन महिने आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. या प्रकारच्या स्ट्रोकमध्ये मेंदूतील ब्लड सर्कुलेशन थांबतं. यामुळे मृत्यूचाही धोका आहे.
नोव्हेंबर २०२२ मध्ये सलूनमध्ये केस धुत असताना हैदराबादमधील एका ५० वर्षीय महिलेला स्ट्रोक आला. केस धुत असताना तिला चक्कर येणं, मळमळ आणि उलट्या झाल्या, जो नंतर स्ट्रोक असल्याचं निदान झालं. अशा घटनांना सलून स्ट्रोक किंवा ब्युटी पार्लर स्ट्रोक म्हणून ओळखलं जातं.