दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी ३०० कोरोना रुग्ण; रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 08:18 AM2022-04-17T08:18:26+5:302022-04-17T08:19:03+5:30
शुक्रवारी दिल्लीत ३२५ कोरोनाबाधित आढळले होते. शनिवारी ही संख्या ३६६ वर पोहोचली आहे. शुक्रवारचा संक्रमणाचा दर २.३९ टक्के होता. तो शनिवारी ३.९५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
नवी दिल्ली : सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत ३०० पेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून आल्याने दिल्ली सरकारची चिंता वाढली आहे. त्याचप्रमाणे संक्रमण दरात झपाट्याने वाढ झाल्याने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शाळा प्रशासनाला अधिक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
शुक्रवारी दिल्लीत ३२५ कोरोनाबाधित आढळले होते. शनिवारी ही संख्या ३६६ वर पोहोचली आहे. शुक्रवारचा संक्रमणाचा दर २.३९ टक्के होता. तो शनिवारी ३.९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. अचानकपणे वाढलेल्या या दरामुळे प्रशासनाने खबरदारीचे उपाय करण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शाळांना अधिक काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या शाळांमध्ये कोरोनाबाधित विद्यार्थी व शिक्षक आढळले, ती शाळा बंद करण्याचे निर्देश दिल्याचे सिसोदिया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या शाळा तात्पुरत्या बंद राहील. स्थिती सुधारल्यानंतर पुन्हा या शाळा सुरू केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचे भरती होण्याचे प्रमाण बरेच कमी झाले होते; परंतु गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. सुदैवाने यापैकी एकही रुग्ण दगावला नसल्याचे दिल्ली प्रशासनाने म्हटले आहे.