सांडपाण्याच्या विक्रीतून ३०० कोटींची कमाई; नितीन गडकरींनी सांगितला अफलातून बिझनेस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 06:11 AM2022-12-15T06:11:48+5:302022-12-15T06:12:59+5:30
महाराष्ट्र सरकार नागपूरच्या महानगरपालिकेकडून सांडपाणी खरेदी करते. त्याला स्वच्छ करून वीज निर्मितीसाठी याचा उपयोग केला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ज्ञानाचे संपत्तीमध्ये रूपांतर करण्याच्या फॉर्म्युल्यावर माझा विश्वास आहे. सायन्स, टेक्नॉलॉजी आणि रिसर्च या माध्यमातून आपण याचा कसा लाभ घेऊ शकतो, यावर मी विचार करत असतो. मला वाटते बिनकामाचे असे काहीच नाही. त्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी स्पष्ट केले. नागपूरमधील सांडपाणी ७ वर्षांपासून महाराष्ट्र सरकारला विक्री करत आहोत. याचे आम्हाला वर्षाला ३०० कोटी रुपये मिळतात, असेही त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले.
कचऱ्यापासून बायो-व्हिटॅमिन
महाराष्ट्र सरकार नागपूरच्या महानगरपालिकेकडून सांडपाणी खरेदी करते. त्याला स्वच्छ करून वीज निर्मितीसाठी याचा उपयोग केला जातो. या पाण्यातून मिथेन काढून त्यातून सीओटू वेगळे करून बायो-सीएनजी काढले जाते. ते म्हणाले की, सध्या भारत ३० लाख टन व्हिटॅमिन आयात करतो. माझे स्वप्न आहे की, शेतातील काडी कचऱ्यापासून बायो-व्हिटॅमिन बनविले जावे. पुढील महिन्यात याची मशीन लाँच करणार आहोत.