मोठी बातमी! दहशतवादी प्रशिक्षणासाठी भारतातून पाठवल्या गेल्या ३०० मुली; कोण आहेत या मुली?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 05:36 AM2022-06-14T05:36:22+5:302022-06-14T05:36:48+5:30
देशाच्या वेगवेगळ्या भागांतून सुमारे ३०० मुलींना मध्य-पूर्व देशांच्या मार्गे पाकिस्तानात पाठविण्यात आल्याचा संशय केंद्रीय यंत्रणांना आहे.
डॉ. खुशालचंद बाहेती
नवी दिल्ली :
देशाच्या वेगवेगळ्या भागांतून सुमारे ३०० मुलींना मध्य-पूर्व देशांच्या मार्गे पाकिस्तानात पाठविण्यात आल्याचा संशय केंद्रीय यंत्रणांना आहे. या मुलींना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यात येईल. या दृष्टीने यंत्रणा सतर्क झाल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये सतत अशांतता राहावी यासाठी पाकिस्तानच्या आयएसआय गुप्तचर संघटनेकडून गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहेत.
कोण आहेत या मुली?
राज्यातील यंत्रणा हरवलेल्या व्यक्तींचे रजिस्टर धुंडाळून यातील किती मुली परत मिळाल्या याचा तसेच हरविल्या, पण त्याची नोंद नाही, याची माहिती काढण्यात येत असल्याचे समजते. धर्मांतर करून लग्न केलेल्या मुलींचा विशेष करून लग्न करून परदेशी रवाना झालेल्या मुलींचा ठावठिकाणा शोधण्यात येत आहे, अशीही माहिती मिळते आहे.
राज्यांना अलर्ट
निर्यात केलेल्या मुलींची संख्या ३०० पर्यंत असावी असा अंदाज व्यक्त करीत यात धर्मांतरीत मुलींचाही यामध्ये समावेश असण्याची शक्यता केंद्रीय यंत्रणांनी वर्तवली आहे. या दृष्टीने सर्व राज्यांना महिनाभरापूर्वीच सतर्क करण्यात आले आहे.
- १०० मुलींना यापूर्वी दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे.
- ७०० महिलांना पाकिस्तानच्या विविध भागांतील कॅम्पमध्ये दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देत असल्याचे २००९ मध्ये समोर आले होते.
मोहाली बॉम्बहल्ल्यामागे आयएसआयचा हात
९ मे २०२२ रोजी मोहाली येथे पंजाब पोलिसांच्या गुप्तवार्ता विभाग मुख्यालयावर बॉम्बहल्ला झाला. यासाठी रॉकेटचा उपयोग करण्यात आला होता. यामागे आयएसआयचा हात असल्याचे विविध यंत्रणांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
सौंदर्याला प्राधान्य
मुलींना सीमापार पाठवण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाली. यासाठी मुलींच्या सौंदर्याला प्राधान्य दिल्याचाही यंत्रणांना संशय.
हनी ट्रॅपसाठी वापर
प्रशिक्षणानंतर दहशतवादी हल्ले व महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींना हनी ट्रॅपमध्ये ओढण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो, असा अंदाज आहे.