300 काश्मिरी पंडित पुन्हा येणार खोऱ्यात, तीन दशकांनंतर करणार पूजा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 08:16 AM2019-06-08T08:16:00+5:302019-06-08T08:16:40+5:30
दहशतवाद्यांच्या कारणास्तव काश्मीर सोडणाऱ्या काश्मिरी पंडितांना पुन्हा एकदा मातीशी जोडण्याची संधी मिळाली आहे.
श्रीनगरः दहशतवाद्यांच्या कारणास्तव काश्मीर सोडणाऱ्या काश्मिरी पंडितांना पुन्हा एकदा मातीशी जोडण्याची संधी मिळाली आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी श्रीनगरजवळच्या खीर भवानी आईच्या पूजेसाठी या काश्मिरी पंडितांना आमंत्रण पाठवलं आहे. सत्यपाल मलिक यांनी दिलेल्या आमंत्रणानंतर काश्मिरी पंडितांनी आनंद व्यक्त केला आहे. या संधीकडे घरवापसीच्या दृष्टीनं पाहिलं जात आहे.
सात लाख एवढी लोकसंख्या असलेले काश्मिरी पंडित 1990चा काळ विसरू शकत नाहीत. 30 वर्षांची दीपिका सांगते, आता आमची घरवापसी नाही, परंतु आम्हाला पुन्हा काश्मिरात वास्तव्य करायला मिळेल, अशी आशा आहे. आई भवानीचं दर्शन करणं ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. काश्मीरच्या तरुण पिढीसाठी ही बाब महत्त्वाची आहे. कारण काश्मीरच्या तरुण पिढीनं काश्मिरी पंडितांना कधीही पाहिलेलं नाही.
58 वर्षीय दीपक कौल आणि त्यांची पत्नी भारती कौल यांनी स्वप्न साकार होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. ही काही दिवसांची यात्रा कौल कुटुंबीयांना घरवापसीसारखीच वाटत आहे. 1990च्या नरसंहारानंतर रातोरात घर सोडणाऱ्या काश्मिरी पंडितांसाठी हा दिवस अविस्मरणीय आहे. जम्मू-काश्मीर भवनापासून ही यात्रा 10 जून रोजी आई खीर भवानीच्या दर्शनासाठी रवाना होणार आहे. प्रवाशांचा खर्च आणि सुरक्षेची जबाबदारी राज्यपालांनी घेतली आहे. या यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य सरकारला प्रवाशांची संख्या आधीच सोपवलेली आहे. खीर भवानी आईच्या दर्शनानंतर हरी पर्वत श्रीनगर, शंकराचार्य मंदिर असा प्रवास करत हे यात्रेकरू पुन्हा 13 जून रोजी दिल्लीत दाखल होणार आहेत.