300 नक्षलवाद्यांनी केला जवानांवर बेछूट गोळीबार, 25 जवान शहीद

By admin | Published: April 25, 2017 02:58 AM2017-04-25T02:58:11+5:302017-04-25T02:58:11+5:30

नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर ३०० नक्षलवाद्यांनी हल्ला केला.

300 Naxalites made fierce firing on the jawans, 25 jawans martyred | 300 नक्षलवाद्यांनी केला जवानांवर बेछूट गोळीबार, 25 जवान शहीद

300 नक्षलवाद्यांनी केला जवानांवर बेछूट गोळीबार, 25 जवान शहीद

Next

रायपूर : नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर ३०० नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यात कमांडर रघुवीर सिंह यांच्यासह २५ जवान शहीद झाले असून, सहा जवान अत्यवस्थ आहेत. सुकमा जिल्ह्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध करत, हे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे निर्धारपूर्वक सांगितले.
सुकमाच्या चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुरकापालपासून दीड किलोमीटर दूर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी दुपारी १२.१५ वाजता गस्तीवर असलेल्या पोलीस दलावर गोळीबाार केला. सुरक्षा पथकानेही तत्क्षणीच पलटवार करीत गोळीबार केल्याने, दोन्ही बाजूने गोळीबाराची धुमश्चक्री उडाली. नक्षलवाद्यांनी या वर्षी केलेला हा अत्यंत भीषण हल्ला होय.
सोमवारीस सकाळी या पथकाला गस्तीसाठी रवाना करण्यात आले होते. यात शंभर जवान होते. दुपारी १२ वाजता बुरकापाल नजीक हे पथक पोहोचताच दबा धरून बसलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. नक्षलवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे होती. सुरक्षा जवानांनीही कणखरपणे मुकाबला करीत पलटवार केला. जवळपास तीन तास भीषण चकमक सुरू होती, असे राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
जखमी जवानांना घटनास्थळावरून उपाचारासाठी दुसरीकडे हलविण्यात येत असून, या भागात अजूनही शोधमोहीम सुरू आहे, असे पोलीस प्रमुख ए. एन. उपाध्याय यांनी सांगितले. या हल्ल्याची माहिती मिळताच, दिल्लीचा दौरा अर्धवट सोडून मुख्यमंत्री रमन सिंह हे तातडीने रायपूरकडे रवाना झाले.  बस्तर विभागातील कालापाथर नक्षलवाद्यांनी सुरक्षा पथकावर हल्ला केला. कोब्रा कमांडोज आणि इतर पथकासह घटनास्थळी जवानांचाअतिरिक्त फौजफाटा रवाना करण्यात आला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
दंतेवाडास्थित अरनपूर पोलीस ठाण्यासातील कोंडपारा भागातील शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलाना एक दहा किलोचा बॉम्ब आढळला. सुरक्षा दलाने तो तातडीने निकामी केल्याने अनर्थ टळला. 
या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दु:ख व्यक्त केले आहे. राज्यमंत्री हंसराज अहिर यांना स्थितीचा आढावा घेण्यासाठी छत्तीसगढला रवाना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. हा हल्ला आम्ही आव्हानच समजतो. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आधी गावकऱ्यांना पाठवले, मग हल्ला केला!-
रायपूर येथे उपचारासाठी आणण्यात आलेला जवान शेर मोहम्मद याने सांगितले की, ‘आम्ही बंदोबस्तावर असताना ३०० नक्षलवाद्यांनी आमच्या गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांत दोन महिलांही होत्या. नक्षलवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे होते.
आम्हीही तडाखेबाज पलटवार केला. यात १२ हून अधिक नक्षली मारले गेले.’ अन्य एका जखमी जवानाने सांगितले की, ‘नक्षलवाद्यांनी आधी आमच्या मागावर गावकऱ्यांना पाठवून, आमचा ठावठिकाणा घेतला. हल्लेखोरांत काही महिलाही होत्या.’
बलिदान व्यर्थ जाणार नाही -
तीव्र शब्दांत धिक्कार करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा हल्ला भ्याड आणि निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असेही त्यांनी निर्धारपूर्वक सांगितले. सरकार स्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे, असे त्यांनी टिष्ट्वट केले आहे.

Web Title: 300 Naxalites made fierce firing on the jawans, 25 jawans martyred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.