अस्वलाच्या हल्ल्यात तरुणाचा चेहरा झाला विद्रूप; डॉक्टरांनी 300 टाके अन् सर्जरी करून केला चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 11:16 AM2022-01-06T11:16:11+5:302022-01-06T11:16:38+5:30
सरकारी एसएसजी रुग्णालयातील डॉक्टरांनी हा चमत्कार केला असून ही सर्जरी अत्यंत यशस्वी झाली आहे. बाहेर अतिशय खर्चिक ठरणारी ही शस्त्रक्रिया सरकारी रुग्णालयात मोफत करण्यात आली
नवी दिल्ली - अस्वलाच्या हल्ल्यात पूर्णपणे विद्रूप झालेला तरुणाचा चेहरा डॉक्टरांनी तब्बल 300 टाके अन् सर्जरी करून ठीक केल्याची घटना समोर आली आहे. सरकारी एसएसजी रुग्णालयातील डॉक्टरांनी हा चमत्कार केला असून ही सर्जरी अत्यंत यशस्वी झाली आहे. बाहेर अतिशय खर्चिक ठरणारी ही शस्त्रक्रिया सरकारी रुग्णालयात मोफत करण्यात आली. छोटा उदेपूर येथील पाविजेतपूर तालुक्यातील अंबापूर गावात राहणारा 26 वर्षीय धर्मेश राठवा हा 1 जानेवारी रोजी गावातील शेतात गेला असता त्याच्यावर अस्वलाने हल्ला केला.
अस्वलाने केलेल्या हल्ल्यामध्ये धर्मेशच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. चेहऱ्याचा जवळपास प्रत्येक भाग गंभीर जखमी झाला होता. त्याला त्यानंतर तातडीने जखमी अवस्थेत वडोदरा येथील एसएसजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. खरंतर, त्याच्या चेहऱ्याचा एक तृतीयांश भाग पूर्णपणे खराब झाला होता. पण डॉक्टरांनी केलेल्या प्लास्टिक सर्जरीनंतर आता तो नीट बरा झाला आहे. प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख आणि SSG हॉस्पिटलचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शैलेश कुमार सोनी यांनी याबाबत माहिती दिली.
तब्बल चार तास केली शस्त्रक्रिया
"जेव्हा तरुणाला आमच्याकडे आणण्यात आलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर बिया, धूळ, पानं आणि दगडही रोवले गेले होते. सुरुवातीला आम्हाला त्याला रेबीज, टिटॅनस आणि अँटीबायोटिक शॉट्स द्यावे लागले, चेहऱ्याची पुनर्रचना करण्यासाठी ऑपरेशन करण्यापूर्वी सीटी-स्कॅन करावं लागलं" असं म्हटलं आहे. डॉ. सोनी यांनी डॉ. भाग्यश्री देशमाणकर, डॉ. नलिन प्रजापती, डॉ. सुदर्शन यादव आणि डॉ. रिद्धी सोमपुरा यांच्यासह तब्बल चार तास या व्यक्तीची शस्त्रक्रिया केली. तरुणाचं नाकही श्वसनमार्गापासून पूर्णपणे वेगळं झालेलं होतं. चार तास चाललेल्या या सर्जरीत व्यक्तीच्या चेहऱ्यावर 300 टाके टाकण्यात आले.
"हाडांचे सर्व भाग एकत्र करणं हे एक कोडं होतं"
तरुणाची नाकाची रचना पूर्णपणे खराब झालेली असल्याने डॉक्टर कविता लालचंदानी, डॉ. नेहा शाह आणि डॉ. रिमा गोमेटी यांचा समावेश असलेल्या भूलतज्ज्ञांच्या टीमला संपूर्ण आव्हानात्मक शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला बेशुद्ध ठेवण्यासाठी थांबावे लागले. "आम्ही त्वचेचा काही भाग व्यवस्थित मिळवला. उर्वरित चेहऱ्याच्या पुनर्रचनेसाठी टायटॅनियम प्लेट्स आणि जाळी वापरली. हाडांचे सर्व भाग एकत्र करणं हे एक कोडं होतं" असं देखील डॉ. सोनी यांनी म्हटलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.