‘प्लाझ्मा थेरपी’साठी ३०० तबलिगी करणार साहाय्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 04:48 AM2020-04-29T04:48:35+5:302020-04-29T04:48:45+5:30
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनातून बरे झालेल्यांना प्लाझ्मासाठी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.
नवी दिल्ली : तबलिगी जमातशी संबंधित ३०० कोरोना रुग्णांनी आजारातून बरे झाल्यावर प्लाझ्मा (रक्तातील पिवळसर द्रव) थेरपीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, तर १२ जणांनी सोमवारी या थेरपीसाठी रक्तदान केले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनातून बरे झालेल्यांना प्लाझ्मासाठी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सुल्तानपुरी येथे कोरोनातून बरे झालेल्या तबलिगीच्या चार सदस्यांनी रक्तदान केले. त्याचप्रमाणे अन्य ठिकाणीही जमातच्या काही जणांनी प्लाझ्मासाठी रक्तदान केले आहे. कोरोनाच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरातील अन्टीबॉडीज कोरोनाबाधित रुग्णाला दिल्या जातात. त्याद्वारे कोरोना रुग्णाची प्रतिकार क्षमता वाढून तो बरा होतो. ३०० पेक्षा अधिक तबलिगींनी प्लाझ्माद्वारे इतर रुग्णांना साहाय्य करण्यासाठी सहमती अर्जावर स्वाक्षरी केल्या आहेत. नरेला सेंटरमध्ये १९०, सुल्तानपुरीमध्ये ५१, मंगोलपुरीतील ४२ जण त्यासाठी रक्तदान करणार आहेत. दिल्ली सरकारचा आरोग्य विभाग प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून उपचार करीत आहे. या आधीपासून या उपचार पद्धतीमुळे अनेक रुग्ण बरे झाले आहेत. तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांनीही आजारातून बरे झालेल्या जमातच्या लोकांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले होते. लोकनायक रुग्णालयात बरे झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्माद्वारे कोरोनाबाधितांवर उपचार केले जात आहेत.