३०० वर्षे जुने उर्दू महाभारत लखनौतील मंजुल कुटुंबाकडे
By admin | Published: October 2, 2015 11:29 PM2015-10-02T23:29:59+5:302015-10-02T23:29:59+5:30
जुन्या लखनौतील करबाला कॉलनीतील मंजुल कुटुंबाला मौल्यवान खजिना गवसला आहे. आपल्या कुटुंबाकडे वारसारूपाने चालत आलेली ही संपत्ती एवढी मौल्यवान असेल
लखनौ : जुन्या लखनौतील करबाला कॉलनीतील मंजुल कुटुंबाला मौल्यवान खजिना गवसला आहे. आपल्या कुटुंबाकडे वारसारूपाने चालत आलेली ही संपत्ती एवढी मौल्यवान असेल याची कल्पनाही त्यांनी कधी केली नव्हती. या कुटुंबाकडे गेल्या पाच पिढ्यांपासून चालत आलेला हा अमूल्य ठेवा म्हणजे सुमारे ३०० वर्षांपूर्वी उर्दूत लिहिलेले महाभारत होय. पणजोबा मवाली हुसेन नसीरबादी यांनी रायबरेली या जन्मगावी आपल्या वाचनालयात हा ग्रंथ जतन करून ठेवला होता. तो परंपरेने फरमान यांच्याकडे चालत आला.
विशेष म्हणजे उर्दूत लिहिलेल्या या महाभारतातील प्रत्येक प्रकरणात अरबी आणि पर्शियन भाषेत प्रस्तावना दिली आहे. फरमान यांची आई शहीन अख्तर यांनी या ग्रंथाची कहाणी सांगताना गेल्या पाच पिढ्यांपासून त्याचे जतन कुटुंबासाठी लाभदायी मानले आहे.
माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर हा ग्रंथ कुठेतरी हरविला होता, असे फरमान यांनी सांगितले. या कुटुंबाचे मित्र ‘कारी’ (धार्मिक शिक्षक) वहीद अब्बास यांनी हे पुस्तक तपशीलवार वाचले आहे. हे गंगा- जमुना परंपरेचे प्रतीक असून येणाऱ्या पिढ्यांसाठी जतन केले जावे, असे ते म्हणाले. हाजी तलीब हुसेन आणि त्यांचे मित्र दुर्गाप्रसाद यांनी उर्दू वाचकांसाठी हे पुस्तक लिहिले.
या पुस्तकाचे मूळ शिया इमाम हजरत अली नक्वी यांनी जतन केलेल्या पुस्तकांमध्ये आढळून येते, ते नंतर मंजूल कुटुंबाकडे आले. हा ग्रंथ म्हणजे केवळ शब्दश: अनुवाद नसून ते सोप्या गोष्टीरूपात लिहिलेले आहे. प्रत्येक प्रकरणात अरेबिक अवतरणांमध्ये माहिती दिली आहे, असे अब्बास यांनी नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)