मंकीपॉक्स हातपाय पसरू लागला, दिल्लीत चौथा रुग्ण आढळला; देशात एकूण ९ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 09:57 PM2022-08-03T21:57:58+5:302022-08-03T21:59:00+5:30
भारतात मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिल्लीत एका ३१ वर्षीय महिलेला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. त्याचवेळी, आता देशात मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या नऊ झाली आहे.
भारतात मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिल्लीत एका ३१ वर्षीय महिलेला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. त्याचवेळी, आता देशात मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या नऊ झाली आहे. दिल्लीत आतापर्यंत मंकीपॉक्सचे चार रुग्ण समोर आले आहेत. लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात प्रथमच एक महिला मंकीपॉक्स पॉझिटिव्ह आढळून आली आहे. ही महिला मूळची नायजेरियाची असून, सध्या ती पश्चिम दिल्लीत राहात होती. एका दिवसापूर्वीच महिलेला डीडीयू रुग्णालयातून लोकनायक रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार, गरज भासल्यास रुग्णालय आणि आयसोलेशन रूमची संख्या आणखी वाढवता येईल. या सर्व रुग्णालयांमध्ये मंकीपॉक्सच्या संसर्गाशी लढा देण्यासाठी, WHO ने ठरवून दिलेली मानकं लक्षात घेऊन सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
दिल्ली सरकार सतर्क
मंकीपॉक्सच्या वाढत्या केसेस पाहता दिल्ली सरकारनं तयारी तीव्र केली आहे. यासाठी दिल्ली सरकारनं लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात २० आयसोलेशन रूम, गुरुतेग बहादूर हॉस्पिटलमध्ये १० आयसोलेशन रूम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये १० आयसोलेशन रूम आरक्षित केल्या आहेत. एवढेच नाही तर कैलाश दीपक हॉस्पिटल, एमडी सिटी हॉस्पिटल आणि बत्रा हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर तुघलकाबादसह सरकारी हॉस्पिटलमध्ये तसेच तीन खासगी हॉस्पिटलमध्ये 10-10 आयसोलेशन रूमची व्यवस्था करण्यात आली आहे.
जगभरात 16 हजारांहून अधिक रुग्ण
23 जुलैपर्यंत जगभरातील 75 देशांमध्ये मंकीपॉक्सचे 16 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंकीपॉक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केलं आहे. भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे नऊ रुग्ण समोर आले आहेत, त्यापैकी चार दिल्लीतील आहेत. यातील दोन रुग्णांवर लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात उपचार सुरू होते. एक रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला सोमवारी रात्री डिस्चार्ज देण्यात आला.