आता डरकाळी ३ हजार वाघांची; देशात ३,१६७ वाघ, २०० नी वाढली संख्या; पंतप्रधानांकडून व्याघ्रगणना जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 05:31 AM2023-04-10T05:31:56+5:302023-04-10T05:32:37+5:30
देशात वाघांची संख्या ३,१६७ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ च्या व्याघ्रगणनेची आकडेवारी जाहीर केली. ‘हा अभिमानाचा क्षण आहे.
म्हैसूर (कर्नाटक) :
देशात वाघांची संख्या ३,१६७ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ च्या व्याघ्रगणनेची आकडेवारी जाहीर केली. ‘हा अभिमानाचा क्षण आहे. पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांच्यातील सहअस्तित्वाला भारत महत्त्व देतो,’ असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.
रविवारी ‘प्रोजेक्ट टायगर’ प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. वाघांच्या संरक्षण संवर्धनासाठी ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ या संघटनेची स्थापनाही त्यांनी केली.
खुल्या जीपमधून जंगल सफारीचा आनंद
मोदी रविवारी सकाळी साडेआठ वाजता बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात पोहोचले. टी-शर्ट, ट्राउझर, जॅकेट, टोपी, काळा चष्मा आणि कॅमेऱ्यासह ते नवीन लुकमध्ये दिसले. तेथे त्यांनी खुल्या जीपमध्ये सुमारे २० कि.मी. लांब जंगल सफारी केली.
यानंतर त्यांनी कर्नाटकच्या सीमेला लागून असलेल्या मुदुमलाई राष्ट्रीय उद्यानातील थेप्पाकडू एलिफंट पार्क गाठले आणि हत्तींना ऊस भरवला. तेथे ऑस्कर विजेता लघुपट ‘द एलिफंट व्हिस्पर्स’चे चित्रीकरण झाले होते. चित्रपटात दिसणारा हत्ती रघू आणि त्याला वाढवणारे बोमन आणि बेली यांचीही पंतप्रधानांनी भेट घेतली.
‘७५’चा असाही याेगायाेग
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षी जगभरातील एकूण वाघांपैकी ७५ टक्के वाघ भारतात आहेत. तसेच जवळपास ७५ हजार वर्ग किलाेमीटर एवढ्या परिसरात देशातील व्याघ्रप्रकल्पांचा विस्तार झाला आहे.
देशात अशी वाढली वाघोबांची संख्या
२००६- १४११
२०१०- १७०६
२०१४- २,२२६
२०१८- २,९६७
२०२२- ३१६७
२०२२ मध्ये भारतातील वाघांची संख्या ३,१६७ वर पोहोचली, या आकडेवारीचा हवाला देत मोदी म्हणाले, ‘देशात वाघांची संख्या वाढली आहे. त्यावरून दिसून येते की, आमचे हे कुटुंब वाढत आहे. हा अभिमानाचा क्षण आहे‘ कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, आदी उपस्थित होते.
चित्त्यांचे यशस्वी आंतरखंडीय स्थानांतर
-भारतातून अनेक दशकांपूर्वी चित्ता नामशेष झाल्याचे निदर्शनास आणून देताना, पंतप्रधानांनी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून चित्ते भारतात आणले गेल्याविषयी सांगितले.
- चित्त्यांचे हे पहिले यशस्वी आंतरखंडीय स्थानांतर आहे. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्याची चार पिल्ले जन्माला आली, असेही त्यांनी सांगितले.