31 डिसेंबरला मिळणार सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकीय वाटचालीचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 09:37 AM2017-12-26T09:37:20+5:302017-12-26T09:59:33+5:30
दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत राजकारणात उतरणार कि, नाहीत त्याचे उत्तर येत्या 31 डिसेंबरला मिळणार आहे. मागच्या काही महिन्यांपासून राजकारणात सक्रिय होण्याच्या दिशेन रजनीकांत यांची पावले पडत आहे.
चेन्नई - दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत राजकारणात उतरणार कि, नाहीत त्याचे उत्तर येत्या 31 डिसेंबरला मिळणार आहे. मागच्या काही महिन्यांपासून राजकारणात सक्रिय होण्याच्या दिशेन रजनीकांत यांची पावले पडत आहे. पण त्यावर 31 डिसेंबरला शिक्कामोर्तब होईल. राजकारण माझ्यासाठी अजिबात नवीन नाही. फक्त उशीर झालाय. राजकारणातील प्रवेश विजयाप्रमाणे आहे. मी येत्या 31 डिसेंबरला पुढील राजकीय वाटचालीची घोषणा करेन असे सुपरस्टार रजनीकांत यांनी मंगळवारी जाहीर केले.
दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांनी चेन्नईच्या श्री राघवेंद्र कल्याण मंडपममध्ये चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. मागच्या काही महिन्यांपासून रजनीकांत सातत्याने आपल्या चाहत्यांशी संवाद साधून राजकीय चाचपणी करत आहेत. त्याचवेळी त्यांनी राजकीय विधाने करुन राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिले होते. रजनीकांत राजकारणात उतरल्यास तामिळनाडूतील पूर्ण राजकारण बदलून जाईल.
तामिळनाडूत रजनीकांत यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांनी राजकारणात प्रवेश करावा अशी त्यांच्या चाहत्यांची तीव्र इच्छा आहे. रजनीकांत यांचे राजकीय मुल्य लक्षात घेऊनच त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश करावा यासाठी भाजपा मागच्या दोन वर्षांपासून प्रयत्न करत आहे. पण रजनीकांत भाजपासोबत जाणार कि, स्वतंत्र पक्ष काढणार त्याचे उत्तर 31 डिसेंबरलाच मिळेल.
मागच्या चार दशकातील तामिळनाडूचा इतिहास बघितला तर, लोकप्रिय व्यक्तींनीच इथले सत्ता सिंहासन संभाळले आहे. दिवगंत मुख्यमंत्री जयललिता यांचे अकाली निधन आणि वृद्धापकाळाने राजकारणात सक्रीय नसलेले करुणानिधी यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरुन काढण्याची क्षमता रजनीकांत यांच्यामध्ये आहे. त्यामुळे रजनी यांचे असंख्य चाहते त्यांच्या राजकीय प्रवेशाची वाट पाहत आहेत.
पण त्याचवेळी विरोधकांनी त्यांनी कानडी असण्याचा मुद्दा उपस्थित करुन रजनी यांच्या राजकीय प्रवेशाला विरोध केलाय. रजनीकांत कन्नड आहेत, त्यामुळे त्यांनी तामिळनाडूच्या राजकारणापासून दूर राहावं अशी मागणी केली होती. काही महिन्यांपूर्वी चाहत्यांशी संवाद साधताना रजनीकांत यांनी चाहत्यांना मोठ्या लढ्यास तयार राहण्याचे आवाहन केले होते. मी पक्का तामिळीच आहे. जर तामिळी लोकांनी स्वीकारले नाही तर मी थेट हिमालयात जाईन, असे रजनीकांत यांनी म्हटले होते.
I am not new to politics. I got delayed.Entering is equal to victory. I will announce a decision on December 31: Rajinikanth pic.twitter.com/0WsH67ZLeS
— ANI (@ANI) December 26, 2017