एएन-32 अपघात : शहिदांचे पार्थिव शोधण्यास गेलेली रेस्क्यू टीमच संकटात; 9 दिवसांपासून अडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 04:04 PM2019-06-29T16:04:18+5:302019-06-29T16:05:01+5:30
साप, विंचूंसारख्या विषारी प्राण्यांसोबतच त्यांच्याकडे आवश्यक अन्न, पाणीही नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
ईटानगर : गेल्या महिन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये अपघातग्रस्त झालेल्या हवाईदलाचे एएन-32 विमानतील शहिदांना आणण्यासाठी गेलेली रेस्क्यू टीमच खराब हवामानामुळे गेल्या 9 दिवसांपासून अडकली आहे. साप, विंचूंसारख्या विषारी प्राण्यांसोबतच त्यांच्याकडे आवश्यक अन्न, पाणीही नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. खराब हवामानामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचताही येत नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. स्थिती सुधारल्यानंतर हेलिकॉप्टरद्वारे एअरलिफ्ट करण्यात येईल.
हवाई दलाचे मालवाहू विमान 3 जूनपासून गायब होते. अरुणाचलमध्ये हे विमान बेपत्ता झाले होते. यामध्ये हवाई दलाच्या 8 क्रू मेंबरसोबत 13 जण प्रवास करत होते. या विमानाच्या शोधासाठी सुखोई 30, सी 130 सुपर हर्क्युलस, पी8आय एअरक्राफ्ट, ड्रोन आणि सॅटेलाईटचा वापर करत शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याशिवाय नौदल, सैन्य, गुप्तहेर संघटना, आयटीबीपी आणि पोलिसांचे जवानही शोध घेत होते. आठ दिवस ही शोधमोहिम राबविण्यात आली होती. या दरम्यान, एमआय-17 हेलिकॉप्टरला या विमानाचे अवशेष जंगलात दिसून आले होते.
यानंतर 12 जूनला सियांग जिल्ह्यातील जंगलामध्ये दोन हेलिकॉप्टरद्वारे 12 जणांच्या रेस्क्यू टीमला उतरविण्यात आले होते. 19 जूनला या डोंगररांगांमधून 6 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. तर 20 जूनला 7 जणांचे मृतदेह मिळाले होते.
हवेचा प्रवाह मोठा असल्याने या भागात विमान किंवा हेलिकॉप्टर उडविणे कठीण बनते. यामुळे या ठिकाणी पोहोचणे हवाई दलाला शक्य झालेले नाही. अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास या जवानांनाही प्राणाला मुकावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.