२०० जागांवर ३२९५ उमेदवार; काँग्रेस, भाजपाला बंडखोरीने ग्रासले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 05:26 AM2018-11-23T05:26:53+5:302018-11-23T05:27:28+5:30
राजस्थानात विधानसभेच्या २०० जागांसाठी एकूण ३२९५ अर्ज दाखल झाले आहेत. एकट्या जयपूर शहर व जिल्ह्यातील १९ जागांसाठी ५०२ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
- सुहास शेलार
जयपूर : राजस्थानात विधानसभेच्या २०० जागांसाठी एकूण ३२९५ अर्ज दाखल झाले आहेत. एकट्या जयपूर शहर व जिल्ह्यातील १९ जागांसाठी ५०२ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पण काँग्रेस व भारतीय जनता पार्टी या दोन्ही महत्त्वाच्या पक्षांना बंडखोरीने ग्रासले आहेत. काँग्रेसच्या बंडखोरांची संख्या ५0 च्या आसपास आहे. त्यात ४ माजी मंत्री आणि सहा माजी आमदार आहेत. गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक व राजीव सातव हे तिन्ही नेते या बंडखोरांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवाय अशोक गेहलोत, सचिन पायलट आणि अविनाश पांडे या नेत्यांनीही या बंडखोरांना भेटून त्यांना समजावण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपाच्या ४ मंत्री व अनेक आमदारांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. त्यांच्यासह उमेदवारी न मिळालेल्या भाजपाच्या किमान ३0 जणांनी अपक्ष म्हणून उभे राहून भाजपाच्या अधिकृत उमेदवारांपुढेच आव्हान निर्माण केले आहे. मतांचे विभाजन रोखण्यासाठी बंडखोर उमेदवारांची मनधरणी करून, त्यांना उमेदवारी मागे घेण्याची विनवणी सुरू आहे. स्वत: वसुंधरा राजे, प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी, अविनाश राय खन्ना हे या बंडखोरांना समजावत आहेत. भाजपाने यंदा ४ मंत्री व ६0 आमदारांना उमेदवारी दिलेली नाही.
श्रीगंगानगर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांतून १०९ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. शिवाय हनुमानगड जिल्ह्यातील पाच जागांसाठी ७३, बिकानेरच्या सात जागांसाठी ११४, चुरु जिल्ह्यातील सहा जागांसाठी १०२, झुंनझुनूच्या सात जागांसाठी १०८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
सिकर जिल्ह्याच्या आठ
मतदारसंघांतून १४०, अलवरच्या ११ जागांसाठी १९०, तर भरतपूरच्या सात जागांसाठी १०३ अर्ज दाखल झाले.जोधपूर जिल्ह्यातही १० जागांसाठी १६६ अर्ज दाखल झाले आहेत. राजपुतांचा प्रभाव असलेल्या चितौडगड जिल्ह्यातील पाच जागांसाठी ६९ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
...या उमेदवाराविरुद्ध पैसे वाटल्याचा गुन्हा
आपल्या वाचाळपणामुळे नेहमी चर्चेत असलेले आमदार ज्ञानदेव अहुजा यांच्याविरुद्ध मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ते जयपूरच्या संगनेर मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढत आहेत.
अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी मोठी रॅली काढली. यावेळी त्यांनी खिशातून १०० रूपयांच्या नोटा काढून रॅलीत सहभागी झालेल्यांना वाटले.
हा व्हिडिओ व्हायरल झाला. याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने बनीपार्क पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.