राज्यसभा बंद पाडल्याचा ३३ काँग्रेस सदस्यांवर ठपका

By admin | Published: May 4, 2016 02:10 AM2016-05-04T02:10:13+5:302016-05-04T02:10:13+5:30

तद्दन बेशिस्त वर्तन करून आणि वारंवार अडथळे आणून सोमवारी राज्यसभेचे कामकाज बंद पाडल्याबद्दल राज्यसभा सचिवालयाने काँग्रेसच्या ३३ सदस्यांवर ठपका ठेवला आहे.

33 Congress MPs in the Rajya Sabha | राज्यसभा बंद पाडल्याचा ३३ काँग्रेस सदस्यांवर ठपका

राज्यसभा बंद पाडल्याचा ३३ काँग्रेस सदस्यांवर ठपका

Next

नवी दिल्ली : तद्दन बेशिस्त वर्तन करून आणि वारंवार अडथळे आणून सोमवारी राज्यसभेचे कामकाज बंद पाडल्याबद्दल राज्यसभा सचिवालयाने काँग्रेसच्या ३३ सदस्यांवर ठपका ठेवला आहे. काँग्रेस संसदीय पक्षाने यावर लगेच कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी तृणमूल काँग्रेसने मात्र या प्रकरणी सभापतींनी पक्षपात केल्याचा आरोप करत सभात्याग केला.
दिवाळखोरीत गेलेल्या गुजरात राज्य पेट्रोलियम कॉर्पोरेशनला कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील भूगर्भवायू उत्खननासाठी भाडेपट्टा दिला जाण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत काँग्रेस सदस्यांनी सोमवारी राज्यसभेत गोंंधळ घातला होता. त्यावरून सभापतींनी कामकाज वारंवार तहकूब केले होते. तृणमूल काँग्रेसचे सुखेंदू शेखर रॉय यांनीही हा मुद्दा स्वतंत्रपणे लावून धरला होता. सभापतींचा आदेश न पाळल्याबद्दल त्यांना दिवसभरासाठी सभागृहाबाहेर काढले गेले होते.
संसदेच्या दिवसभराच्या कामकाजातील ठळक बाबींची नोंद करणारे एक अधिकृत बुलेटिन अधिवेशन काळात प्रसिद्ध केले. सोमवारच्या राज्यसभेतील कामकाजासंबंधी जे बुलेटिन काढले गेले त्यात बेशिस्त वर्तन करून व वारंवार अडथळे आणून कामकाज चालू न दिल्याबद्दल एकूण ३३ काँग्रेस सदस्यांचा नावानिशी उल्लेख केला गेला. या ३३ सदस्यांचा ‘बेशिस्त’, ‘नियम मोडणारे’ व ‘सभापतींचा आदेश झुगारणारे’ म्हणून नामोल्लेख केलागेला त्यात मधुसूदन मिस्त्री, रेणुका चौधरी व आॅस्कर फर्नांडिस या नेत्यांसह गोव्याचे शांताराम नाईक व महाराष्ट्रातील हुसेन दलवाई यांचाही समावेश होता.
मंगळवारी राज्यसभेचे कामकाज सुरू होताच तृणमूल काँग्रेसचे गटनेते डेरेक ओ‘ब्रायन यांनी उपर्युक्त बुलेटिन व त्यातील काँग्रेसच्या ३३ सदस्यांचा नामोल्लेख यांचा मुद्दा मांडला व या काँग्रेस सदस्यांवर का कारवाई केली गेली नाही, असा सवाल केला. ओ‘ब्रायन म्हणाले की, आमच्या पक्षाचे सदस्य सुखेंदू शेखर चौधरी यांना सभापतींनी दिवसभरासाठी सभागृहाबाहेर काढले. चौधरी यांनीही कोणताही वाद न घालता सभापतींच्या आदेशाचे पालन केले. ओ‘ब्रायन म्हणाले की, सभापतींनी बोलू नका सांगूनही चौधरी बोलत होते, हे खरे. मात्र ते त्यांच्या आसनावर बसूनच बोलत होते. काँग्रेसचे सदस्य आपल्या जागा सोडून आले होते व आरडाओरड करीत होते. त्यांच्याविरुद्ध काहीच कारवाई केली गेली नाही. तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी ‘आम्ही व्यथित झालो आहोत’, असे सांगत सभात्याग केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

सभापतींचा निर्णय अंतिम; त्यावर वाद घातला जाऊ शकत नाही
राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ अन्वये प्रत्येकाला समानतेचा व समान वागणुकीचा हक्क आहे. सभागृहातील बेशिस्त वर्तनाबद्दल एका सदस्यावर कारवाई
केली जाणे व अन्य ३३ जणांना काहीही कारवाई न करता सोडून दिले जाणे
याने या हक्काचे उल्लंघन झाले नाही का, असा मुद्दा ओ‘ब्रायन यांनी मांडला व पीठासीन अधिकाऱ्यांनी यावर निर्णय द्यावा अशी मागणी केली. यावर उपसभापती पी.जे. कुरियन म्हणाले की, सोमवारीच कारवाई सभापतींनी
(डॉ. हमीद अन्सारी) केलेली असल्याने त्यावर मी काहीच बोलू शकत नाही. सभापतींचा निर्णय अंतिम असतो. त्यावर वाद घातला जाऊ शकत नाही.

Web Title: 33 Congress MPs in the Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.