कोरोनातून बरे झालेल्या ३३ टक्के विमा ग्राहकांना अद्यापही भरपाईची प्रतीक्षा, महाराष्ट्रात २९ हजार प्रकरणे प्रलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 01:24 AM2020-12-25T01:24:47+5:302020-12-25T01:25:26+5:30
insurance : केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार अनेक राज्यांमध्ये कोरोना कवच तसेच नियमित आरोग्य विम्याचा परतावा मिळालेला नाही.
नवी दिल्ली : कोरोनातून बरे होऊन घरी परतलेल्यांना आरोग्य विम्याचा परतावा मिळण्यास विलंब होत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत दाखल झालेल्या आरोग्य विम्याच्या दाव्यापैकी ६७ टक्के रुग्णांना उपचारावर झालेला खर्च काही प्रमाणात परत मिळाला. उरलेल्या ३३ टक्के रुग्णांना अद्यापही विम्याची रक्कम (भरपाई) मिळालेली नाही. केरळमध्ये महाराष्ट्रापेक्षा वाईट स्थिती आहे. तेथे केवळ ५८ टक्के परतावा विमा कंपन्यांनी दिला. विमा कंपन्यांसाठी नियामक असलेल्या आयआरडीएने अद्याप यासंदर्भात अहवाल प्रसिद्ध केलेला नाही. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार अनेक राज्यांमध्ये कोरोना कवच तसेच नियमित आरोग्य विम्याचा परतावा मिळालेला नाही. महाराष्ट्रात डिसेंबर अखेर एकूण २९ हजारांपेक्षाही जास्त प्रकरणे प्रलंबित आहेत. विमा कंपन्यांनी त्या-त्या महिन्याची आकडेवारी प्रसिद्ध करणे बंधनकारक असते. परंतु तांत्रिक कारणे दाखवून त्यासाठी देखील मुदत मागितली जाते. महाराष्ट्रात आतापर्यंत ९४ हजार दावे बरे झालेल्यांकडून करण्यात आले.
विलंब का?
अनेकदा रुग्ण घरी उपचार घेतात. काही जणांवर रुग्णालयात उपचार केले जातात. कागदपत्रांची पूर्तता न करणे हे एक मुख्य कारण विमा दाव्यांना विलंब होण्यामागे दिले जाते. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार ठराविक चाचण्यांचे शुल्क विमा कंपनी देते. काही चाचण्यांचा विम्यात समावेश होत नाही. रुग्णालयात कॅशलेस सुविधा नसणे हेही विलंबाचे कारण मानले जाते.