३३ टक्के एमएसएमई बंद पडण्याच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 04:35 AM2020-06-03T04:35:59+5:302020-06-03T04:36:13+5:30
आॅल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमो) आणि अन्य नऊ औद्योगिक संघटना यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणामधून वरील धक्कादायक निष्कर्ष उघड झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोनाच्या लॉकडाऊननंतर उद्योगधंदे आणि व्यापार पुन्हा सुरू होत असला तरी आपली मर्यादित साधनसामग्री आणि भविष्याबाबतची अनिश्चितता यामुळे देशातील एकतृतीयांश म्हणजेच ३३ टक्के एमएसएमई हे बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे धक्कादायक निष्कर्ष एका सर्वेक्षणामधून निघाले आहेत.
आॅल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमो) आणि अन्य नऊ औद्योगिक संघटना यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणामधून वरील धक्कादायक निष्कर्ष उघड झाले आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात आॅनलाइन पद्धतीने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये ४६,५२५ एमएसएमई आणि व्यावसायिक तसेच कंपन्यांचे सीईओ व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला आहे.
या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यापैकी एमएसएमईमधील ३५ टक्के तर व्यावसायिकांपैकी ३७ टक्के मते ही लॉकडाउनच्या काळामध्ये झालेले नुकसान हे भरून येण्यासारखे नसून त्यामुळे उद्योगांना आपले व्यवसाय गुंडाळण्याखेरीज अन्य काही पर्याय नसल्याचे मत व्यक्त करणारे आहेत. ३२ टक्के एमएसएमर्इंच्या मते हे नुकसान भरून निघण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. अवघ्या १२ टक्के प्रतिसादकांनी केवळ तीन महिन्यांमध्ये हे नुकसान भरून निघण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले आहे.
या उद्योगांवर कर्जाचा मोठा बोजा आहे. त्यामुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. नोटाबंदी आणि जीएसटीपासूनच या उद्योगांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यामध्ये आता वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.
या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी एमएसएमईमधील ३ टक्के, कंपन्यांमधील ६ टक्के आणि ११ टक्के व्यावसायिकांनी कोरोनाच्या संकटाचा आपल्यावर कोणताच परिणाम होणार नसल्याचे सांगितले आहे. ३२ टक्के सहभागींनी आपला उद्योग या समस्येमधून बाहेर पडण्याची शक्यता नसल्याचे मत व्यक्त केले आहे. २९ टक्के सहभागितांनी या संकटामधून बाहेर पडण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
केवळ कोरोनाच कारणीभूत नाही
च्लॉकडाऊनच्या काळामधील झालेले नुकसान, मर्यादित असलेली साधनसामग्री तसेच भविष्यामधील आॅर्डर मिळण्याबाबतची अनिश्चितता या बाबींमुळे एमएसएमई तसेच अन्य व्यावसायिकांना यापुढे व्यवसाय चालणे कठीण असल्याचे वाटत आहे. मात्र, यासाठी केवळ कोरोनाचे लॉकडाऊन हेच कारण नाही. याआधीपासूनच एमएसएमई व छोट्या उद्योगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळेच हे उद्योग बंद पडू शकतील, असे मत या उद्योजकांनी व्यक्त केले आहे.