३३ हत्या करणारा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 04:24 AM2018-09-13T04:24:30+5:302018-09-13T04:24:41+5:30
भोपाळ शहरात छोट्या दुकानात दिवसा कपडे शिवण्याचे काम करणारा आदेश खामरा याने मध्यप्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात गेल्या ८ वर्षांत रात्री तब्बल ३३ जणांची हत्या केली.
भोपाळ (मध्य प्रदेश) : भोपाळ शहरात छोट्या दुकानात दिवसा कपडे शिवण्याचे काम करणारा आदेश खामरा याने मध्यप्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात गेल्या ८ वर्षांत रात्री तब्बल ३३ जणांची हत्या केली. या हत्या झालेले ट्रकचालक व त्यांचे मदतनीस होते. हे हत्याकांड सत्र २०१० मध्ये कधीतरी सुरू झाले.
पहिली हत्या अमरावतीत व दुसरी नाशिकमध्ये झाली. लवकरच मध्यप्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशात मृतदेह सापडू लागले; परंतु कोणालाही या हत्यांमागे मंडिदीपचा मनमिळाऊ स्वभावाचा आदेश खामरा असेल, अशी शंकाही आली नाही. गेल्या आठवड्यात स्थानिक पोलिसांनी खामराला ताब्यात घेतले तेव्हा त्याने ३० हत्यांची कबुली दिल्यावर पोलीस थक्कच झाले. मंगळवारी त्याने मी आणखी तीन जणांना ठार मारले होते, असे सांगितले. त्याला उत्तर प्रदेशातील सुलतानपूरच्या जंगलात गेल्या आठवड्यात तीन दिवस पाठलाग करून पकडले. सहआरोपी जयाकरण याने पोलिसांना सांगितले की, आम्ही त्याला तू ट्रकचालकांना का ठार मारतो, असे विचारल्यावर तो हसायचा व मी त्यांना मुक्ती देतो, असे म्हणायचा. तो ट्रकचालकांशी मैत्री करून त्यांना जाळ्यात ओढायचा.