गुजरातमध्ये विषारी दारूमुळे ३३ लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 05:17 AM2022-07-27T05:17:15+5:302022-07-27T05:18:15+5:30

१४ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा : ४५ हून अधिक लोक उपचाराधिन; बहुतांश आरोपींना केली अटक

33 people died due to toxic liquor in Gujarat | गुजरातमध्ये विषारी दारूमुळे ३३ लोकांचा मृत्यू

गुजरातमध्ये विषारी दारूमुळे ३३ लोकांचा मृत्यू

googlenewsNext

अहमदाबाद : गुजरातच्या बोटाद जिल्ह्यातील विषारी दारूच्या बळींची संख्या मंगळवारी वाढून ३३ झाली. अवैध दारू विक्रेत्यांनी गावठी दारू म्हणून पाणी मिसळलेले जहाल विषारी मिथेल अल्कोहोल (मिथेनॉल) ग्रामस्थांना पाजले होते. मृतांच्या रक्त तपासणीतून ही बाब स्पष्ट झाली, असे पोलीस महासंचालक आशिष भाटिया यांनी गांधीनगर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. खून व अन्य गुन्ह्यांसाठी १४ जणांविरुद्ध तीन प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आले असून, बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. 

प्रकृती बिघडू लागल्याने बोटादच्या रोजीद आणि आसपासच्या गावांतील लोक एकापाठोपाठ बारवेला व बोटाद येथील सरकारी रुग्णालयांत दाखल होऊ लागल्यानंतर सोमवारी सकाळी हे प्रकरण उजेडात आले. विषारी दारू पिल्यामुळे आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील २२ जण हे बोटाद जिल्ह्यातील विविध गावचे रहिवासी असून, सहाजण लगतच्या अहमदाबाद जिल्ह्यातील धनधुका तालुक्यातील आहेत. याशिवाय भावनगर, बोटाद व अहमदाबाद येथील रुग्णालयांत सध्या ४५ हून अधिक लोकांवर उपचार सुरू आहेत, असे ते म्हणाले.  
केजरीवालांची टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात विषारी दारू विकली जात आहे. बंदी कुठे आहे, असा सवाल त्यांनी केला. विषारी दारू विकणाऱ्यांना राजकीय संरक्षण असल्याचा आरोप करून त्यांनी विषारी दारूच्या विक्रीतून मिळणारा पैसा जातो कुठे याचा तपास करण्याची मागणी त्यांनी केली. 

आपण भावनगरमधील रुग्णालयाला भेट देणार आहोत, असे केजरीवाल मंगळवारी म्हणाले. धाडींमुळे रसायनांकडे वळले गुजरातमध्ये हातभट्टीचालकांना धाडींमुळे गावठी दारू तयार करणे कठीण झाले आहे. त्यामुळे ते अशा रसायनांत पाणी मिसळून त्यांची गावठी दारू म्हणून विक्री करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गोदामातून चोरले जहाल विष

n    अहमदाबाद येथील एका गोदामात व्यवस्थापक म्हणून काम करणार्या जयेश ऊर्फ राजू याने त्याच गोदामातून ६०० लिटर मिथेल अल्कोहोल चाेरून ते बोटाद येथील त्याचा नातेवाईक संजय याला ४० हजार रुपयांत विकले होते.
n    हे औद्योगिक विद्रावक (दुसरा पदार्थ स्वत:मध्ये विरघळवून घेणारा) आहे हे माहीत असूनही संजयने हे रसायन अवैध दारू विक्रेत्यांना विकले.

n    या विक्रेत्यांनी नंतर त्यात पाणी मिसळून त्याचे पाऊच तयार केले आणि गावठी दारू म्हणून त्यांची २५ जुलैला रोजीद, रानपरी, चंदारवा, देवगणा, चोकडी या गावांसह बोटाद जिल्ह्यातील अन्य गावच्या ग्रामस्थांना विक्री केली, असे तपासात समोर आले.
n    दरम्यान, पोलिसांनी यापैकी ४६० लिटर रसायन जप्त केले आहे.

२००० रुपयांत २० लिटर : मी पिंटू देवीपूजक याच्याकडून २००० रुपयांत २० लिटर मिथेनाॅल विकत घेतले होते, असे गावठी दारू विकणाऱ्या गजुबेन वड्डारिया हिने पोलिसांना सांगितले. मिथेनॉल विकत घेतल्यानंतर त्यात पाणी मिसळून त्याचे पाऊच २० रुपयाला एक याप्रमाणे अनेक ग्रामस्थांना विकले, असे ती म्हणाली.

तीन सदस्यीय समिती : दरम्यान, गुजरातच्या गृहविभागाने वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुभाष त्रिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली एक तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. दारूबंदी व उत्पादन शुल्कचे संचालक एम. ए. गांधी तसेच गुजरात न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे संचालक एस. पी. संघवी यांचा या समितीत समावेश आहे.

Web Title: 33 people died due to toxic liquor in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.