भाजपने दिला ३३ टक्के खासदारांना नारळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 06:03 AM2019-04-08T06:03:53+5:302019-04-08T06:04:05+5:30
काही स्वेच्छेने, तर काही वयोमानामुळे दूर
नवी दिल्ली : बंडखोरी होण्याचा धोका पत्करून भारतीय जनता पक्षाने या लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास ३३ टक्के विद्यमान खासदारांना नारळ दिला आहे. शस्त्रक्रियेची गरज लक्षात घेऊन, ज्यांची कामगिरी चांगली नाही वा ज्यांच्या विद्यमान कारकिर्दीबाबत नाराजी आहे, अशा विद्यमान खासदारांना भाजपने या निवडणुकीमध्ये पुन्हा तिकीट दिलेले नाही. भाजप ४३७ जागा लढविणार असून, आजअखेर ४१७ उमेदवारांच्या १९ याद्या घोषित करण्यात आल्या आहेत. अद्याप २0 जागांची घोषणा बाकी असून, आतापर्यंत ८२ विद्यमान खासदार घरी बसवले आहेत. पक्ष आणखी कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप ४३७ जागा लढविणार असून, उर्वरित जागा या राष्टÑीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांसाठी सोडल्या आहेत. सन २०१४च्या मोदी लाटेमध्ये निवडून आलेल्यांपैकी ज्यांची कामगिरी चांगली नाही अथवा ज्यांना नाराजीचा फटका बसू शकतो, अशा खासदारांना यंदा तिकिटे न देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. यामध्ये स्वेच्छेने न लढण्याचा निर्णय घेतलेल्या नेत्यांसोबतच ७५ वर्षे पूर्ण झालेल्या खासदारांचाही समावेश आहे. सोळाव्या लोकसभेत ५४३ निवडून देण्यात येणाऱ्या सदस्यांमध्ये भाजपचे २६८ सदस्य आहेत.
दिल्लीतील सर्व सात जागा, १३ पैकी तीन जागा पंजाबमधील, चंदीगढमधील एक, राजस्थानमधील ९ आणि हरयाणामधील दोन विद्यमान खासदारांचा पत्ता नव्या यादीत कापण्यात आला आहे.
ज्या खासदारांची कामगिरी चांगली झालेली नाही अथवा ज्यांचे प्रस्थापितत्व हे त्यांच्या विरोधातील नाराजीचे कारण बनू शकते, अशा खासदारांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपने आणि मुख्यत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे डावलले गेलेले तसेच त्यांचे समर्थक यांच्या बंडखोरीचा धोका लक्षात घेऊनही हा निर्णय पक्षाने घेतला आहे.
पक्षाध्यक्ष अमित शाह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा निश्चित अंदाज असल्याने त्यांनी हा कठीण निर्णय घेतला आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या बंडखोरीचा बंदोबस्त कसा करावयाचा याचीही त्यांनी व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे पक्षशिस्त ही महत्वाची असल्याचा संदेशही ते सर्वांना देऊ इच्छितात. उर्वरित याद्यांमध्येही काही जणांचा पत्ता कापला गेल्यास सुमारे ५0 टक्के नवोदितांना भाजपाकडून उमेदवारीची संधी मिळेल. येत्या ४८ तासात हरयाणा, पंजाब आणि दिल्लीतील आणखी उमेदवार जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे.
वयोवृद्धांना संधी नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना निवडणुकीमध्ये न उतरविण्याचा घेतलेला निर्णयही अनेक खासदारांना संधी नाकारणारा ठरला आहे. यामुळे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी तसेच लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन
यांना यंदा पक्षाने तिकिट दिलेले नाही.
अन्य कारणांमुळे यंदाच्या लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात नसलेल्या विद्यमान खासदारांमध्ये किरीट सोमय्यांचाही समावेश आहे. स्वेच्छेने ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेणाºयांमध्ये उमा भारती, सुषमा स्वराज या खासदारांचाही समावेश आहे.
राज्यात सात नवे चेहरे
भाजपने राज्यातील सात विद्यमान खासदारांना यंदा तिकीट नाकारले आहे. त्यात जायंट किलर ठरलेले सोलापूरचे शरद बनसोडे, सलग तीन टर्म खासदारकी करणारे दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण आणि किरीट सोमैय्या हे प्रमुख आहेत. याशिवाय दिलीप गांधी ( नगर), ए. टी. पाटील (जळगाव), अनिल शिरोळे (पुणे), सुनील गायकवाड (लातूर) हेही यंदा निवडणूक लढविणार नाहीत.
दिल्लीत सर्वच जागांवर नवे चेहरे
च्भाजपने दिल्लीत सर्वच्या सर्व सातही जागांवर विद्यमान खासदारांऐवजी नव्या चेहºयांना संधी दिली आहे. भाजपच्या नेत्यांनी दिल्लीत मोठी शस्त्रक्रिया केली आहे.
च्गेल्या तीन लोकसभेत खासदार असणाºया मीनाक्षी लेखी, उदित राज, महेश गिरी यांना तिकिट दिले जाणार नाही. छत्तीसगढमध्येही भाजपने सर्व ११ जागांपैकी १0 विद्यमान खासदारांना घरी बसविले आहे.