मध्यप्रदेशात २०१६ मध्ये ३३ वाघांचा मृत्यू...!
By admin | Published: January 3, 2017 04:01 AM2017-01-03T04:01:00+5:302017-01-03T04:01:00+5:30
एकेकाळी वाघांचा संरक्षक हे बिरुद मिरवणारा मध्यप्रदेश आता त्यांच्यासाठी शत्रूक्षेत्र ठरला आहे. या राज्यात २०१६ मध्ये तब्बल ३३ वाघ मृत्युमुखी पडले
भोपाळ : एकेकाळी वाघांचा संरक्षक हे बिरुद मिरवणारा मध्यप्रदेश आता त्यांच्यासाठी शत्रूक्षेत्र ठरला आहे. या राज्यात २०१६ मध्ये तब्बल ३३ वाघ मृत्युमुखी पडले. ही संख्या देशात सर्वाधिक आहे. शिकार, आपसातील लढाई आणि नैसर्गिक कारणे यासह विविध कारणांमुळे वाघ मृत्युमुखी पडले.
गेल्या ५ वर्षांत मध्यप्रदेशात ११ छाव्यांसह ८९ वाघांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, २०१२ मध्ये १६ वाघांचा मृत्यू झाला, तर २०१३ मध्ये ११ वाघ मृत्युमुखी पडले. २०१४ मध्ये १४, २०१५ मध्ये १५ आणि २०१६ मध्ये ३३ वाघांचा मृत्यू झाला. २०१२ पासून २०१५ पर्यंत दरवर्षी सरासरी १४ वाघांचा मृत्यू झाला, तर गेल्या वर्षी ३३ वाघ मृत्युमुखी पडले. हे प्रमाण गेल्या चार वर्षांतील प्रमाणाच्या तुलनेत दुप्पट आहे.
गेल्या ५ वर्षांत मृत्युमुखी पडलेल्या ८९ वाघांपैकी ३० वाघ आपसातील लढाईत मृत्युमुखी पडले, तर २२ वाघांना शिकाऱ्यांनी विष किंवा विजेचा धक्का देऊन ठार मारले. उर्वरित वाघ आजारपण, वृद्धावस्था किंवा इतर कारणांमुळे मृत्युमुखी पडले.
वन अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत, वन्यजीव कार्यकर्त्याचा आरोप
वाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढण्यास वन अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा हेही एक कारण आहे, असा आरोप वन्यजीव कार्यकर्ते अजय दुबे यांनी केला. या ५ वर्षांत मृत्युमुखी पडलेल्या ८९ वाघांपैकी ३० वाघ हद्दीच्या वादावरून आपसात झालेल्या लढाईत मारले गेले, तर २२ वाघांना शिकाऱ्यांनी शिकार करून, विष देऊन किंवा विजेचा झटका देऊन ठार केले. जर वनविभाग सतर्क राहिला असता, तर या ५२ वाघांचे प्राण वाचविता येऊ शकत होते, असे ते म्हणाले.
कोणत्याही वाघाच्या अनैसर्गिक मृत्यूबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदार ठरविले जावे, अशी शिफारस केंद्राच्या कृती गटाने २००५ मध्ये केली होती. तथापि, या शिफारशीचे राज्यात पालन झाले नाही. सरकारी अधिकारीच न्यायालयात जबाब फिरवत असल्यामुळे शिकारी सहजपणे सुटतात. शिक्षा झालेल्या शिकाऱ्यांची संख्या नगण्य आहे, असेही त्यांनी सांगितले.