देशात सात महिन्यांत ३३ हजार टन जैववैद्यकीय कचरा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 05:57 AM2021-01-11T05:57:10+5:302021-01-11T05:57:33+5:30
महाराष्ट्रात सर्वाधिक; ऑक्टोबरमध्ये जास्त प्रमाण
नवी दिल्ली : कोरोना साथीमध्ये गेल्या सात महिन्यांत देशामध्ये ३३ हजार टन जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील अशा कचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
कोरोनामुळे ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला. त्याचे प्रमाण ५,५०० टन होते, अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे. देशात गेल्या सात महिन्यांत कोरोना साथीमुळे ३२,९९४ टन जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला. त्याची १९८ जैववैद्यकीय कचरा केंद्रांमध्ये विल्हेवाट लावण्यात आली. या कचऱ्यात जुने झालेले पीपीई संच, मास्क, हातमोजे, रक्ताचे नमुने, ड्रेसिंग, प्लास्टर, इंजेक्शनच्या सुया, सिरिंज आदींचा समावेश होता.
कोरोनामुळे विविध राज्यांपैकी जेथे सर्वाधिक जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला त्यांचा तपशील याप्रमाणे आहे. महाराष्ट्र (५,३६७ टन), केरळ (३,३०० टन), गुजरात (३,०८६ टन), तामिळनाडू (२,८०६ टन), उत्तर प्रदेश (२,५०२ टन), दिल्ली (२,४७१ टन), पश्चिम बंगाल (२,०९५ टन), कर्नाटक (२,०२६
टन).