३४ लाखांच्या बसमध्ये शिपाई करतात आराम
By admin | Published: May 22, 2017 03:24 AM2017-05-22T03:24:11+5:302017-05-22T03:24:11+5:30
मध्यप्रदेशचे तत्कालीन वनमंत्री विजय शाह यांनी वन विभागासाठी ३४ लाख रुपयांची बस खरेदी केली खरी; पण आतापर्यंत या बसचा उपयोगच होऊ शकला नाही
भोपाळ : मध्यप्रदेशचे तत्कालीन वनमंत्री विजय शाह यांनी वन विभागासाठी ३४ लाख रुपयांची बस खरेदी केली खरी; पण आतापर्यंत या बसचा उपयोगच होऊ शकला नाही. या काळात वन विभागाचे तीन मंत्री बदलले आहेत. सध्या वन विभागाचे शिपाई या बसमध्ये आराम करीत आहेत. कडक उन्हाळ्यात एसी आॅन करून बसमधील सोफ्यावर हे शिपाई आराम करतानाचे चित्र दिसत आहे. २००८ मध्ये ही बस खरेदी करण्यात आली होती. तत्कालीन वनमंत्री विजय शाह ही बस घेऊन खंडवा येथे गेले होते. तेव्हा लक्षात आले की, ही बस वनांचलमध्ये चालू शकत नाही. कारण, खड्डे आल्यानंतर बस खालच्या बाजूने जमिनीला लागते. अशा परिस्थितीत बस परत करणेही शक्य नव्हते. अधिकाऱ्यांकडूनही ही बस लपविण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. दर दोन महिन्याला या बसची जागा बदलण्यात येत आहे. आता ही बस इको टुरिझमसाठी देण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस आता वनमंत्री डॉ. गौरीशंकर शेजवार यांच्यासाठी तयार करण्यात आली आहे. या बसने ते जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.
बसच्या सोफ्यांचे कुशन कव्हरही बदलण्यात आले आहेत. एअर कंडिशनचेही काम करण्यात आले आहे. या बसमध्ये दोन केबिन, किचनही आहे. एकूणच काय तर सरकारसाठी ही बस ‘नाकापेक्षा मोती जड’ अशी झाली आहे.