सलगी करण्यास विरोध केल्याने ३४ विद्यार्थिनींना शाळेतच मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 12:27 AM2018-10-08T00:27:33+5:302018-10-08T00:28:41+5:30
सुपौल जिल्ह्यातील त्रिवेणीगंज ब्लॉकमधील दारपाखा गावातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या मागासवर्गीय व अल्पसंख्य समाजातील मुलींसाठीच्या वस्तीशाळेत ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. जखमी मुली सहावी ते आठवीतील आहेत.
पाटणा : शाळेच्या भिंतींवर अश्लिल मजकूर लिहून व येता-जाता आचरट टोमणे मारून त्रास देणाऱ्या व प्रसंगी शारीरिक सलगी करू पाहणा-या मवाल्यांना सामूहिकपणे खंबीर विरोध करून पिटाळून लावले म्हणून एका शाळेतील ३४ विद्यार्थिनींना शेजारच्या गावातील लोकांनी शाळेत येऊन बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना बिहारच्या सुपौल जिल्ह्यात घडली.
सुपौल जिल्ह्यातील त्रिवेणीगंज ब्लॉकमधील दारपाखा गावातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या मागासवर्गीय व अल्पसंख्य समाजातील मुलींसाठीच्या वस्तीशाळेत ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. जखमी मुली सहावी ते आठवीतील आहेत.
मुली मैदानात खेळताना मिडल स्कूलचे काही विद्यार्थी व शेजारच्या गावातील मुले तेथे येऊन टोमणे मारत होते. काहींनी सलगी करण्याचाही प्रयत्न केला. या मुलींनी दगड फेकत व काठ्या मारत त्यांना पिटाळून लावले. नंतर या मुलांचे पालक व गावकरी याचा १५-२० जणांचा जमाव शाळेत आला. त्यांनी वस्तीशाळेतील मुलींना बेदम मारहाण केली व शाळेतही मोडतोड केली. दोन जखमी मुलींची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी खास करून मुलींच्या वस्तीशाळांमध्ये यापुढे महिला पोलीस व महिला सुरक्षारक्षक तैनात केले जातील.
- कृष्णनंदन प्रसाद वर्मा, शिक्षणमंत्री, बिहार