देशभरात ३४ वंदे भारत एक्स्प्रेस, पण ‘या’ राज्यात अद्याप एकही सेवा नाही! जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 06:06 PM2023-10-16T18:06:27+5:302023-10-16T18:07:10+5:30
Vande Bharat Express Train: देशातील एक राज्य असे आहे, जिथून वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू करण्यात आलेली नाही.
Vande Bharat Express Train: आताच्या घडीला देशभरात ३४ वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची सेवा सुरू झाली असून, आणखी ९ मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, देशात एक राज्य असे आहे, ज्या राज्यात अद्यापपर्यंत एकही वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू करण्यात आलेली नाही. कोणते आहे ते राज्य, ते जाणून घेऊया...
सन २०१९ मध्ये पहिली वंदे भारत एक्स्प्रेस दिल्ली ते वाराणसी मार्गावर चालवण्यात आली होती. शताब्दी ट्रेनच्या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. यानंतर आता स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. याशिवाय सर्वसामान्यांसाठी वंदे मेट्रो आणि साधारण वंदे भारत ट्रेन चालवण्याची रेल्वेची योजना आहे. देशभरात या ट्रेन चालवल्या जाणार असून, अन्य राज्यांकडूनही अधिक वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन चालवण्याची मागणी होत आहे. मात्र, देशातील एक राज्य असे आहे, जिथून वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू करण्यात आलेली नाही.
या राज्यातून २ वंदे भारत एक्स्प्रेस जातात, पण...
देशातील पंजाब राज्य असे आहे, जिथून एकही वंदे भारत एक्स्प्रेस चालवली जात नाही. पंजाब सरकारने अमृतसर आणि भटिंडा ते दिल्ली मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सेवा सुरू करावी, अशी मागणी केली आहे. मात्र, अद्याप पंजाब सरकारची मागणी मान्य करण्यात आलेली नाही. पंजाबमधून दोन वंदे भारत ट्रेन जात असल्या तरी पंजाबसाठी थेट वंदे भारत ट्रेन नाही. नवी दिल्ली-कटरा वंदे भारत एक्सप्रेस, ऑक्टोबर २०१९ मध्ये सुरू करण्यात आली होती. ती पंजाबमधील लुधियानामधून जाते. त्याचप्रमाणे, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू झालेली नवी दिल्ली-अंबअदोरा वंदे भारत एक्सप्रेस चंदीगड आणि आनंदपूर साहिबमधून जाते. दिल्लीहून जास्तीत जास्त सहा वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. परंतु, पंजाब राज्याची किंवा पंजाब राज्यातून सुरु होणारी वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेल नाही.