ऑनलाइन गेममध्ये जिंकले ३.५ लाख, मात्र काही दिवसांतच संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 11:56 AM2024-08-30T11:56:34+5:302024-08-30T11:57:15+5:30
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे एका तरुणाने ऑनलाइन गेम्सच्या माध्यमातून साडे तीन लाख रुपये जिंकले होते. मात्र हेच साडेतीन लाख रुपये या तरुणाच्या मृत्यूचं कारण ठरलं.
मागच्या काही काळात ऑनलाइन गेम्सचं प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये या ऑनलाइन गेम्समधील विजेत्याबरोबर धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे एका तरुणाने ऑनलाइन गेम्सच्या माध्यमातून साडे तीन लाख रुपये जिंकले होते. मात्र हेच साडेतीन लाख रुपये या तरुणाच्या मृत्यूचं कारण ठरलं. त्याचं झालं असं की, या तरुणाने जिंकलेले साडे तीन लाख रुपये हडपण्यासाठी गावातील काही गावगुंडांनी त्याला त्रास देण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून या तरुणाने अखेर गळफास लावून जीवन संपवले. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, पोलीस पुढील तपास करत आहे.
ही घटना अमेठीमधील मुंशीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सरायखेमा गावात घडली आहे. येथे राहणाऱ्या राकेश यादव नावाच्या तरुणाने काही दिवसांपूर्वी ऑनलाइन अॅपवरील गेममध्ये ३ लाख ५५ हजार रुपये जिंकले होते. ही रक्कम जिंकल्यानंतर गावातील काही गुंडांनी त्याला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे हा तरुण त्रस्त होता.
मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा राकेश यादव काही दिवसांपूर्वी मोबाईलवरील ऑनलाईन गेम्समध्ये जिंकला होता. त्याने या खेळात जिंकलेल्या पैशांचं वृत्त हे गावभर पसरलं होतं. तसेच ही बाब गावातील काही गावगुंडांना समजताच त्यांनी पैसे हडप करण्याच्या बहाण्याने राकेश याला त्रास देण्यास सुरुवात केली. दरडावून धमकावून त्यांनी त्याच्याकडून ५५ हजार रुपये उकळले. मात्र या गावगुंडांचं तेवढ्यावर समाधान झालं नाही. त्यांनी आणखी पैसे मागण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्रस्त होऊन राकेशने अखेर त्याचं जीवन संपवलं.
दरम्यान, मृत राकेशची आई शांती देवी यांनी मुंशीगंज पोलीस ठाण्यात तक्रार देताना सांगितले की, माझ्या मुलाने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन गेम्समध्ये साडे तीन लाख रुपये जिंकले होते. त्यानंतर गावातीलच अनुराग जयसवाल, तुफान सिंह, विशाल सिंह आणि हंसराज मौर्य त्याला त्रास देऊ लागले होते. ते नेहमी राजेशला मारहाण करायचे. तसेच त्याचाकडून पैसे हिसकावून घ्यायचे. दरम्यान, काल रात्रीही त्यांनी राजेशला त्रास दिला. त्यामुळे वैतागून अखेर राजेशने जीवन संपवलं, असा दावा त्याच्या आईने केला.